अनंत गीते यांचे प्रतिपादन

जिल्हा परिषदेतील भष्टाचाऱ्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. वेगवेगळ्या पक्षांशी युती करून आपली दुकाने चालवणाऱ्यांना जिल्हा परिषदेतून हद्दपार करा. असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. सेना- काँगेस युतीमुळे शेकापची झोप उडाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

ते अलिबाग तालुक्यातील नागाव येथे शिवसेना, काँग्रेस भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून घालविण्यासाठी सर्वानी एकत्र यावे. हा जनतेचाच कौल होता. त्याचा आदर राखूनच आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र शिवसेना- काँग्रेस एकत्र आल्याने शेकाप- राष्ट्रावादीची झोप उडाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या खेळी करत ते फिरत आहेत. मतदार सुज्ञ असून त्यांना निवडणुकीत योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काही लोकांनी जिल्हा परिषदेत स्वत:ची दुकाने मांडली आहेत. त्यामुळे संस्थानिक असल्यासारखे ते काम करीत आहेत. ही दुकानदारी बंद करण्याची आता वेळ आली आहे. जिल्ह्य़ाच्या सर्वागिण विकासासाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपा आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. असे आवाहन गीते यांनी यावेळी केले.

शेकापने नेहमीच विकासाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे रायगडचा विकास खुंटला. तालुक्यातूनच नव्हे तर शेकापला जिल्ह्य़ातून हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचे मत यावेळी भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. प्रविण ठाकूर, सुरेंद्र म्हात्रे, विजय कवळे, उदय काठे आदींनी उपस्थितांना संबोधित केले. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी, भाजपाचे हेमंत दांडेकर, अ‍ॅड्. महेश मोहिते, शिवसेनेचे अ‍ॅड्. सुशील पाटील, दीपक रानवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. योगेश मगर यांनी आभार प्रदर्शन केले.