मागील काही दिवसांपासून राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. नितीन राऊत यांनी स्वत: ट्वीटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

“मला करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन करत आहे. सर्वांनी सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या,” असं राऊत म्हणाले. त्यांनी ट्वीटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 गुरूवारी २४ हजारांपेक्षा अधिक रुग्ण

महाराष्ट्रात गुरूवारी २४ हजार ६१९ नवे करोनाबाधितांची नोंद झाली. तर ३९८ जणांचे मृत्यू झाले आहेत. तर दुसरीकडे १९ हजार ५२२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात आजवर तपासण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ७० हजार ७४८ होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख १ हजार ७५२ केसेस अॅक्टिव्ह आहेत.