महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे १२ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचा-यांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं. याचा व्हिडीओ ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेअर केला असून कर्मचाऱ्यांना सलाम ठोकला आहे.

नितीन राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणा-या चार मुख्य वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा- तळेगाव या वीज वाहिणीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम व अतिखोल भागात वादळ आणि वाऱ्यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम”.

नितीन राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ कर्मचारी किती धोका पत्करुन काम करत आहे हे स्पष्ट दिसत आहे.

ऊर्जा मंत्र्यांनी व्यक्त केली होती घातपाताची शक्यता
मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं ट्विट नितीन राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली होती. नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटसंबंधी पत्रकारांशी बोलताना मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही, त्यामुळेच आपण घातपाताची शक्यता वर्तवली असल्याचं सांगितलं होतं. ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

“मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं साधी बाब नाही आणि तुम्हीसुद्धा ते समजू नये. म्हणूनच याच्यामध्ये निश्चितच घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं. काही लोक खासकरुन ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीकोनातून काहीही घडू शकतं. ते पडताळून पाहणं राज्याचं ऊर्जा मंत्री या नात्यानं माझं काम आहे, ते मी करतोय,” असं नितीन राऊत यांनी म्हटलं होतं.