डबडबलेले डोळे, दाटलेले हुंदके आणि काळजात न सामावणारी वेदना घेऊन महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी शनिवारी आपल्या प्रिय अण्णांना निरोप दिला. संघर्षांच्या आगीत अवघे आयुष्य झोकून दिलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांना करवीरनगरीच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राने अखेरचा लाल सलाम दिला. पंचगंगेच्या तीरावर त्यांची कन्या मेघा बुट्टे, स्मिता सातपुते, सून मेधा पानसरे, नातू समीर, मल्हार व अमित यांनी गोविंदभाईंच्या पार्थिवाला अग्नी दिला तेव्हा तेथे जमलेल्या बायाबापडय़ा, कष्टकरी, शेतमजूर यांच्या दुखाचा बांधच फुटला.
कॉ. गोविंद पानसरे यांचे पाíथव दुपारी विमानाने कोल्हापुरात आणण्यात आले. त्यानंतर तेथून ते दसरा चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. लाल पोशाख परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी पार्थिवाभोवती कडे केले होते. ‘शहीद कॉम्रेड गोिवद पानसरे अमर रहे’च्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी हजारो कार्यकर्ते, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, कम्युनिस्ट कार्यकत्रे, घरकामगार महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
गेले पाच दिवस मृत्यूशी कडवा संघर्ष करीत असलेल्या या झुंजार नेत्याचे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यूने महाराष्ट्राने कुशल संघटक, अनुभवसिद्ध लेखक, पुरोगामी विचारवंत आणि अन्यायाविरुद्ध लढणारा आणखी एक कार्यकर्ता गमावला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या सोमवारी सकाळी कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर मारेकऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोल्हापूरच्या अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी पुढील उपचारांसाठी त्यांना खास हवाई रुग्णवाहिकेने मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले.
दसरा चौकात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य कार्यकर्त्यांनी पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शहराच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकत्रे गटागटाने दाखल होत होते. त्यांच्या हातात पानसरे यांच्या प्रतिमा होत्या. अनेक चौकांमध्ये श्रध्दांजली फलक लावण्यात आले होते.

कॉ. गोविंद पानसरे यांचे पार्थिव शनिवारी कोल्हापुरातील दसरा चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी रेड आर्मीच्या तरुणांनी आणि पानसरे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लाल सलाम दिला. या वेळी पक्षाचा ध्वज अध्र्यावर उतरविण्यात आला.

कोल्हापूरात ‘बंद’
दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे शनिवारी कोल्हापुरात सर्व व्यवहार बंद राहिले. अनेक ग्रामीण भागातही अशीच परिस्थित होती. व्यवहार बंद ठेवून कार्यकत्रे गटागटाने ‘पानसरे अमर रहे’ अशा घोषणा देत दसरा चौकात जमत होते. शनिवारी सकाळपासूनच व्यापारी, कारखानदारांनी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, शाहूपुरी, गंगवेश, महाद्वार रोड अशा सर्वच ठिकाणी बंदची स्थिती होती.

..आहे लाखोंची छाती!
कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला टोल वा अन्य प्रश्नासाठी नव्हे तर प्रबोधन चळवळ दडपण्यासाठी झाल्याचे भारत पाटणकर यांनी आदरांजली वाहताना म्हटले. शाहीर संभाजी भगत यांनी पोवाडय़ाद्वारे ‘सांगा हिटलरच्या वारसदारांनो मुडदे पाडणार किती.. गोळ्या झेलण्यास आहे लाखोंची छाती,’ अशा शब्दांत आदरांजली वाहिली.

आज महाराष्ट्र बंद
कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या आघाडीने आज, रविवारी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेसने सक्रिय पाठिंबा दिल्याचे माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादीनेही बंदला पाठिंबा दिल्याचे सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. रिपब्लिकन पक्षानेही बंदला पाठिंबा दिला असून कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलन करतील, असे खासदार रामदास आठवले यांनी सांगितले. शिवसेना आणि भाजपने मात्र बंदबाबत उघडपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

क्रांती, परिवर्तन माझ्याच डोळ्यासमोर होणार नाही म्हणून मी मैदानातून पलायन करणार नाही. माझ्या नंतरच्या पिढीला माझ्या लढाईचे श्रेय मिळाले तरी चालेल. 
कॉ. पानसरे

एका नि:स्वार्थी विचारवंताची अशा पद्धतीने हत्या हे निव्वळ भ्याडपणाचे कृत्य आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा माझा विश्वास आहे. कॉ. पानसरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
– सी. विद्यासागर राव, राज्यपाल

ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला केवळ व्यक्ती अथवा विचारांवरील हल्ला नाही तर तो व्यवस्थेवरील हल्ला आहे. व्यवस्थेला आव्हान देण्याचा हा प्रयत्न असून राज्य शासन तो मोडून काढेल आणि हल्लेखोरांचा तातडीने शोध घेतला जाईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

कॉ. गोविंद पानसरे यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील डाव्या आणि पुरोगामी चळवळीला एक प्रचंड मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रातल्या सर्व डाव्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष शक्तींनी अशा वेळी एकत्र येऊन निर्धाराने याचा मुकाबला करायला हवा.
– डॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

कॉ. गोविंद  पानसरे यांचा खून संपत्तीसाठी करण्यात आलेला नाही. चांगल्या विचारांना नष्ट करण्यातून तो झाला आहे. जनता शांतताप्रिय असते; पण संघटित वर्ग समाजामध्ये अशा प्रकारचा दहशतवाद निर्माण करतो.
– प्रा. गोपाळ दुखंडे, ज्येष्ठ समाजवादी नेते

 
आदरांजली
.. हा तर विचारांवरील हल्ला
कॉम्रेड डांगेनंतर बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले एकच होते ते म्हणजे कॉम्रेड पानसरे. ते फक्त कामगार चळवळीतील नेते नव्हते, तर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतही त्यांचे मोठे योगदान होते. आम्ही विद्रोही साहित्य संमेलन करत असताना आमच्यातच फाटाफूट झाली होती. तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. २००७ पासून त्यांनी अण्णा भाऊ साठे संमेलन भरवायला सुरुवात केली होती. त्यांच्यावरचा हल्ला म्हणजे विचारमंथनावरचा हल्ला आहे.
– कॉ. सुबोध मोरे
***
महाराष्ट्रात ठरवून एकेक विचारी व्यक्तिमत्त्व संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एका ८२ वर्षांच्या माणसाला गोळ्या घालून ठार मारण्याची योजना आखली जाते, हे किती क्रूर आहे. अशा प्रकारे कितीही हत्या घडवून आणल्या तरी पुरोगामी चळवळ संपणार नाही. समाजात पुरोगामी विचारच कायम राहतील. सध्याच्या परिस्थितीत पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेणे हेच कार्यकर्त्यांसमोरचे मोठे आव्हान आहे.
– कॉ. प्रभाकर नारकर
***
कॉ. गोिवदराव पानसरे यांच्या निधनाने सामाजिक चळवळीत राहून दूरगामी विचार करणारा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन लढणारा मित्र हरपला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी शासनाला सापडू शकलेले नाहीत. आता कॉ. पानसरेंचे हल्लेखोरही सापडलेले नाहीत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री चांगले काम करीत असले, तरी अशा घटनांमुळे राज्याला काळिमा लागत आहे, त्यांनी हा विचार करावा.
– बाळासाहेब विखे, ज्येष्ठ नेते
***
१९७५ नंतरच्या म्हणजेच आणीबाणीच्या वेळेस जे कार्यकर्ते घडत होते वा पुढे आले त्यांच्यासाठी कॉ. पानसरे हे प्रेरणास्थान बनले होते. पानसरेंसारख्या स्वत: गरिबीतून आलेल्या नेत्याने कष्टकऱ्यांसाठी केलेला संघर्ष, दिलेला लढा हा नेहमीच प्रेरणादायी राहिलेला आहे. जीवनभर ते कष्टकऱ्यांसाठी, उपेक्षितांसाठी लढले. त्यामुळेच ते कम्युनिस्ट पक्षात असले, त्यांची विचारसरणी वेगळी असली तरी ते कधी परके वाटले नाही.  
– मधु मोहिते, रिपाई नेते
***
अिहसेच्या मार्गाने परिवर्तनाच्या विचारांचे हत्यार घेऊन प्रतिगामी विचारांचा मुकाबला होऊ शकतो. चाकू-सुऱ्या आणि पिस्तुलांचा काहीही उपयोग नाही हे समाजाने आता ओळखायला पाहिजे आणि शासनाने स्वत:ची अब्रू राखण्याकरिता ताबडतोब कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यामागील मुख्य सूत्रधारांना त्वरित अटक करावी.
– डॉ. विश्वास उटगी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन
***
आधी दाभोलकर आणि आता पानसरे यांची हत्या झाली. ही निषेधार्ह बाब आहे. यामुळे महाराष्ट्रात दहशत निर्माण झाली आहे. हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत.
– आनंद विंगकर, लेखक, कार्यकर्ते
***
गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे शोषितांसाठी अखेपर्यंत लढणारा झुंजार पुरोगामी नेता राज्याने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी भरून निघणार नाही.
– रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष