News Flash

एक एकराच्या जागेत १३० टन ऊस, सांगलीचा शेतकरी कमावतोय लाखांमध्ये

पाण्याच्या योग्य नियोजनावर साधली किमया

पश्चिम महाराष्ट्राचा भाग हा ऊस शेतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नजिकच्या भागातील शेतकरी हे ऊसाचं पिक घेतात. या भागातलं राजकारण आणि अर्थकारणही ऊसावरचं चालतं. सांगलीच्या एका तरुण शेतकऱ्याने पाण्याचं योग्य नियोजन करत एका एकराच्या जागेवर तब्बल १३० टन ऊसाचं उत्पादन घेतलं आहे. ऊसाच्या शेतीला पाणी प्रचंड लागतं…परंतू ३९ वर्षीय अमरने आपल्या एका एकराच्या शेतीत पाण्याचं योग्य नियोजन करत बंपर उत्पादन घेतलं आहे.

बऱ्याचदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पाण्याचा अपव्यय केल्याचा आरोप केला जातो. परंतू अमरने ठिकब सिंचन पद्धतीचा वापर करुन जमिनी आणि मातीचा पोत सुधारत आपल्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कृषी विषयात पदवीचं शिक्षण घेतलेल्या अमरला ऊस शेतीत नवीन प्रयोग करण्याची इच्छा होती. “मी २००६ सालापासून ऊसाचं GSK86032 हे वाण घेतोय. पण यातून माझ्या शेतात फक्त ३०-४० टन ऊस तयार व्हायचा. सर्वात आधी मी कालव्याचं पाणी वापरायचं थांबवून ठिबक सिंचन पद्धतीने गरजेनुसार शेताला पाणी द्यायला लागलो. याचा मला फायदा झाला आणि उत्पादनात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली.” अमर द बेटर इंडिया संकेतस्थळाशी बोलत होता.

एकदा उत्पादन घेऊन झाल्यानंतर ऊसाचं पाचट व इतर पालापोचाळा नवीन पिकासाठी वापरला तर उत्पादनावर परिणाम होतो हे अमरला लक्षात आलं. त्यामुळे प्रत्येक वेळी अमर नर्सरीमधून नवीन रोपं लावतात. ज्यामुळे दुसऱ्या हंगामात येणारं पीक हे चांगलं यायला लागलं. अशा प्रयत्नांमुळे २०१३ साली अमर आपल्या एका एकराच्या शेतीमधून ७० टन ऊसाचं उत्पादन घ्यायला लागले. पण एवढ्यावर थांबणं त्यांना मान्य नव्हतं. अमर यांनी किमान १०० टनाचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं. यानंतर त्यांनी आपल्या पुतण्याच्या मदतीने मातीचा पोत कसा सुधारता येईल याचा अभ्यास करायला सुरुवात केली.

“माझ्या पुतण्यानेही कृषी विषय घेऊन पदवीचं शिक्षण घेतलं आहे. जमिनीचा पोत कसा सुधारायचा यासाठी मला त्याची मदत झाली. सरकारी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत मी त्यांचीही मदत घेतली. मातीमध्ये असलेली आर्द्रता व इतर पोषणमुल्यांचाही पिकावर परिणाम होतो. एकच पीक वारंवार घेतल्यानेही जमिनीचा पोत बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे अमर यांनी ऊसाला पाणी देताना नेहमीच्या पाणवठ्यात नदीचं पाणी मिसळायला लागले. ऊसाला चांगलं पाणी मिळेल याची मी नेहमी काळजी घेतली.”

जमिनीचा पोत कायम राहावा यासाठी अमर यांनी आलटून पालटून मूग, हळद, रताळं, मिरची, सोयाबीन, टोमॅटो अशी पिकं घ्यायला सुरुवात केली. याचसोबत खतांमध्ये अमर यांनी सेंद्रीय खतांवर अधिक भर दिला. या प्रयत्नांच्या जोरावर २०१७ साली अमर यांनी आपल्या एका एकराच्या जमिनीतून १०० टन उसाच्या उत्पादनाचं उद्दीष्ट पार केलं. २०१९ साली त्यांनी १३० टन ऊसाचं उत्पन्न घेत स्वतःला सिद्ध केलं. या प्रयोगशीलतेसाठी अमर यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 3:45 pm

Web Title: maharashtra farmer grows 130 tonnes of sugarcane per acre while conserving water psd 91
Next Stories
1 बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं-संजय राऊत
2 वर्षा राऊत यांना पाठवलेल्या ईडी नोटीशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 “लाभार्थ्यांना उत्तर द्यावंच लागेल”, संजय राऊतांवर निशाणा
Just Now!
X