02 March 2021

News Flash

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनं दारुड्या ठरवलं: धनंजय मुंडे

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे. (संग्रहित)

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारवर शेतकरी आत्महत्येवरून जोरदार हल्ला चढवला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या खोट्या ठरवत आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार दारुड्या ठरवत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीवरून विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला या मुद्द्यावरून कोंडीत पकडले आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पक्ष, एमआयएमच्या नेत्यांनी राज्यभरात संघर्षयात्रा काढली होती. विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसात शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांच्या विरोधाला आणखीनच धार आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या खोट्या ठरवत असून, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना दारुड्या ठरवत आहे, अशी तोफ मुंडे यांनी डागली. मी विरोधी पक्षनेता म्हणून नव्हे तर, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उभा आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आहे, असे ते म्हणाले. पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे जसे लागतात. त्याचप्रमाणे यंदा सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत, असे सांगून दुःखी मनाने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांनी पाहिलेले अच्छे दिनाचे स्वप्न भाबडे ठरले, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. उत्पादन दुप्पट करण्याची सरकारची घोषणा म्हणजे ख्याली पुलाव पकवणाऱ्या शेखचिल्लीसारखी आहे. तुरीचे उत्पादन तिप्पट झाले पण भाव कुठे दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 7:12 pm

Web Title: maharashtra farmer loan waiver dhananjay munde attack bjp government over farmer suicide lagislative assembly
Next Stories
1 जळगाव भाजपमध्ये खडसे-महाजन उभी फूट!
2 ८ भ्रूण १६ आठवडय़ांपेक्षा अधिक दिवसांचे
3 तूर खरेदीची कोंडी कायम, देयकेही मिळेनात
Just Now!
X