मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्यानंतरही राज्यातील काही भागांमध्ये शेतकऱ्यांचा संप सुरुच आहे. आमच्या सर्व मागण्यापूर्ण होईपर्यंत संपावर ठाम आहोत असे पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. शुक्रवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत चर्चा झाल्यावर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र यानंतरही शेतकरी आक्रमक असून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुमारे २०० ते ३०० ग्रामस्थ दळवट फाट्याजवळ पोहोचले. त्यांनी गाड्यांमधून नेला जाणारा कांद्यासह अन्य शेतमाल अडवून ठेवला. संतप्त जमावाने अभोणा पोलीस ठाण्याच्या गाडीवर दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि हवेत गोळीबार करावा लागला.
रविवारी सकाळी १९५ ट्रक भाजीपाला पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या बाजार समितीत दाखल झाला. तर शहराची गरज लक्षात घेता ९५ टँकर दूधही बाजारात आणण्यात आले.

शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी संपाला वेगळेच वळण लागले. किसान क्रांतीच्या समन्वयकांमध्ये फूट पडल्याचे समोर आले असून संपाचे केंद्र असणाऱ्या पुणतांबा येथे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर तह करणारे संयोजक फितूर निघाल्याचा आरोप केला होता.