महाराष्ट्राने जलसंधारणात लक्षणीय कामगिरी केली असली तरी येथील पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसतो आहे. त्यामुळेच राज्याच्या एकूण उत्पन्नात शेतीचा वाटा फक्त ११.३ टक्केच आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात गुंतलेल्या मनुष्यबळाचे प्रमाण मात्र ५० टक्क्यांहून जास्त आहे. साहजिकच येथील नियोजनकर्त्यांनी कृषी धोरणांचा पुनर्वचिार करणे आवश्यक आहे, असे मत अहमदाबाद येथील कामधेनू विद्यापीठाचे कुलगुरू आणि भारतीय कृषी विश्वविद्यालय संघटनेचे अध्यक्ष एम. सी. वाष्र्णेय यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या पस्तिसाव्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश बुरटे, मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राघवेंद्र प, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नयनसिंग राठोड, कुलसचिव जयराम देशपांडे, माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, उपकुलसचिव प्रवीणकुमार यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून त्याची अनियमितताही वाढली आहे. येथील एकूण क्षेत्रापकी ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाची अनिश्चितता कृषी विकासाला मारक ठरते आहे.
पावसालंबी शेतीलाही विपरीत परिस्थितीत सिंचन सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आता तर इतर क्षेत्रांची पाण्याची मागणीही वाढते आहे, असे स्पष्ट करत वाष्र्णेय यांनी सांगितले की मुळात सिंचन क्षेत्रात संपूर्ण देशात महाराष्ट्र आघाडीवरचे राज्य आहे. पण सध्या या क्षेत्राला विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्याचा फटका शेतीला मोठय़ा प्रमाणात बसतो आहेच, पण भविष्यात सिंचन आणि अधिक उत्पादनक्षम पिकांचे नियोजन न केल्यास ही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. शेतीत सुशिक्षित लोकांचा सहभाग वाढण्याची गरज असून व्यवस्थेने त्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या वेळी पदवी परीक्षेत अव्वल ठरलेल्या रेश्मा रेघू, सिद्धी प्रभुगावकर, गरिमा खर्दवाल, फ्रान्सिस किटी, आदित्य आयरे, रामचंद्र वेंगुल्रेकर, सुप्रिया महाडिक, तसेच पद्वव्युत्तर परीक्षेत यशस्वी झालेल्या गौरव सबनीस, सुजाता िशदे, कीर्ती अलवाला, प्रसाद मोरे, हर्षला गिलांडे, मुदस्सीर हकीम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.