भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. शनिवारी मध्यरात्री ही दु्र्दैवी घटना भंडाऱ्यातील जिल्हा रूग्णालयात घडली. मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. तसेच, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

तीन बालकांचा आगीमुळे तर सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू!

या प्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. पण या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला”, अशी अधिकृत माहिती टोपे यांनी दिली.

दरम्यान, भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले.