माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचं पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार बरखास्त करण्यात आलं. शरद पवार पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्राला पहिला मुस्लीम मुख्यमंत्री मिळाले. त्यांचं नाव होतं ए.आर. अंतुले. अंतुले यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली, तितकीचं त्यांचं शिवप्रेम जगजाहीर राहिलं. महाराष्ट्राला लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी शिवाजी महाराजांचं कार्य सामान्यपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी कामं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेऊन पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न केले. कुलाबाच्या नामांतरापासून ते शिवाजी महाराजांची इंग्लडमध्ये असलेली भवानी तलवार परत आणण्यासाठी धडपड केली. त्यांनी घेतलेले काही निर्णय…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्रालयात छत्रपतींचं तैलचित्र –

अनेकांना विश्वास बसणार नाही, पण मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांचं लावण्यात आलेलं तैलचित्र तत्कालिन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्याच काळात लावण्यात आलं. या तैलचित्राविषयीचा किस्साही खास आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात तैलचित्र लावल्यानंतर अंतुले यांनी स्वतः बाहेरून फेरफटका मारत, ते तैलचित्र बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थित दिसतं ना याची खातरजमा केली होती.

गड-किल्ल्यांचं संवर्धन

महाराष्ट्रातील गड किल्ल्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटना घडल्या. या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचा निर्णय अंतुले यांनी घेतला होता. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा इतिहासावर १४ खंड प्रकाशित करण्याचं अंतुले यांनी ठरवलं. त्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची समितीही स्थापन केली होती. ‘अलेक्झांडर द ग्रेट’, ‘अकबर द ग्रेट’,’अशोका द ग्रेट’, यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘शिवाजी द ग्रेट’ या नावाचे खंड प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, दुर्दैवानं हा निर्णय प्रत्यक्षात येण्याआधीच अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात हा निर्णय बाजूला पडला.

कुलाबाचं रायगड झालं –

सध्याचा रायगड जिल्हा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं वेगळं नातं होतं. शिवाजी महाराजाच्या स्वराज्याची राजधानी रायगड असल्याचा अंतुले यांना प्रचंड अभिमान होता. त्यामुळे त्यांनी तत्कालिन कुलाबा जिल्ह्याचं नामकरण रायगड असं केलं.

…तर महाराजांची भवानी तलवार आज महाराष्ट्रात असती

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लडमध्ये आहे. ही तलवार परत आणण्यासाठी अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात धडपड केली. तलवार परत आणण्यासाठी त्यांनी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणी सुरू केली होती. त्यांची बैठकही ठरली होती. पण, या चर्चेच्या आधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्री बसलेले बाबासाहेब भोसले हे राणीशी चर्चा करण्यासाठी गेलेच नाही. ही चर्चा पुढे गेली असती, तर भवानी तलवार कदाचित आतापर्यंत परत आलेली असती.

काय होती अंतुले यांची इच्छा?

“समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपले विरोधक मुस्लीम असूनही त्यांनी कधीही मुस्लिमांवर अविश्वास दाखवला नाही. त्यांच्या अंगरक्षकच मुस्लीम होता. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू-मुस्लीम युद्ध नव्हतं.त्यामुळे शिवाजी महाराजांविषयी जे चुकीचं चित्र रंगवलं गेलं ते दूर करण्याची माझी इच्छा आहे,” असं एकदा अंतुले म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra first muslim chief minister who work for chhatrapati shivaji maharaj bmh
First published on: 19-02-2020 at 11:26 IST