News Flash

“…तर पतंजलीवर कारवाई करणार”; अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचा इशारा

आयुष मंत्रालयानं करोनिलच्या विक्रीसाठी दिली होती परवानगी

काही दिवसांपूर्वी योगगुरू बाबा रामदेव यांच्या पंतजलीनं ‘करोनिल’ हे औषध लाँच केले होते. त्यानंतर या औषधाच्या जाहिरातीवरून आणि विक्रीवरून मोठं वादंग निर्माण झाले होते. तसंच आयुष मंत्रालयानेही पतंजलीला या औषधाची जाहिरात आणि विक्री थांबवण्यास सांगून चाचणीचा अहवालही सादर करण्यास सांगितला होता. त्यानंतर आयुष मंत्रालयानं प्रतिकारशक्तिवर्धक म्हणून परवानगी दिली होती. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जनतेत संभ्रम निर्माण केल्यास पतंजलीवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

“पतंजलीने बाजारात आणलेल्या ‘कोरोनिल’ नावाच्या औषधाने करोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे करोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल,” डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला.

“या औषधामुळे करोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध कोरोनिल हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी असून तिचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे करोना बरा होत नाही,” असं डॉ. शिंगणे म्हणाले.

“कोरोनिल हे औषधासाठी दिलेले नाव आणि प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनिल चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुष मंत्रायकडूनही स्पष्ट

करोनावरील उपचारांसाठी औषध म्हणून योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने नुकत्याच तयार केलेल्या ‘कोरोनिल’च्या विक्रीवर आयुष मंत्रालयाने कुठलेही निर्बंध घातले नसल्याचे कंपनीने बुधवारी सांगितले. मात्र, या रोगाच्या ‘नियंत्रणासाठी’ हे औषध असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, पतंजली ‘कोरोनिल’ हे औषध विकू शकते; मात्र ते कोविड-१९ वरील उपचार म्हणून नाही, असे आयुष मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. मंत्रालयाने या विशिष्ट सूत्रीकरणाला प्रतिकारशक्तिवर्धक म्हणून परवानगी दिली आहे, करोनाचे औषध म्हणून नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 1:57 pm

Web Title: maharashtra food and drug minister dr rajendra shingane warns patanjali coronil not to do false ad jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा हा चमत्कारिक कारभार; शेलारांची सरकारवर टीका
2 पुण्यातील दिव्यांग कुटुंबाची व्यथा; व्यवसाय जोमात असतानाच करोनामुळे उपासमारीची वेळ
3 उदयनराजे साताऱ्यात आणणार रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट
Just Now!
X