काँग्रेसला रामराम करणाऱ्या नारायण राणे यांनी गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिले. ‘माझ्या घरात दोन आमदार असून ज्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे त्यांच्याविषयी काय बोलणार’ असे सांगत राणेंनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पेजच्या अनावरणाच्या कार्यक्रमात नारायण राणेंविषयी भाष्य केले होते. सिंधुदुर्गमध्ये पहिली किक काँग्रेसने मारली आणि आता दोन्ही नेटमधील गोलकिपर म्हणतात माझ्याकडे बॉल नको, असे सांगत त्यांनी राणेंच्या अवस्थेवर सूचक टिप्पणी केली होती. राज ठाकरे यांच्या विधानावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यांचा फुटबॉलच निकामी झाला आहे त्यांना काय उत्तर देणार. त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे असा टोला त्यांनी लगावला. आम्ही कोणत्याही मैदानात फुटबॉल खेळण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले.

नारायण राणे ज्या पक्षात जातात, त्या पक्षातील नेत्यांना असुरक्षित वाटते, मग आता कोणत्या पक्षात जाणार असा प्रश्न राणेंना विचारला असता ते म्हणाले, आता आगामी दिवसात याचाच अभ्यास करणार आहे. मुख्यमंत्रीदेखील अभ्यासू आहेत याकडे पत्रकारांनी राणेंचे लक्ष वेधले. राणेंनीही त्यांच्या शैलीत यावर उत्तर दिले. दोन हुशार विद्यार्थ्यांची मैत्री असतेच असे राणेंना सांगताच हशा पिकला होता. माझी सर्वपक्षीयांशी मैत्री असून अशोक चव्हाण हेदेखील माझे मित्रच आहेत. पण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाच्या पदासाठी ते पात्र नाहीत असे सांगत त्यांनी पक्ष नेत्यांवर निशाणा साधला. कोणी टीका केली तर शाब्दिक प्रहार करायला विसरू नका. त्यांना उत्तर द्या. पण जनतेचे काम करत राहा असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.

नारायण राणेंनी राजीनामा दिला असला तरी नितेश राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही. ते कधी राजीनामा देणार असा प्रश्न राणेंना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. राणे म्हणाले, आम्ही योग्य वेळ शोधतोय, नितेश राणेंच्या राजीनाम्यासाठी वेगळी तारीख असेल. नितेश राणेंसह काँग्रेसचेच काय तर शिवसेनेचे आमदारही राजीनामा देऊ शकतात असे त्यांनी सांगितले.