राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी (FYJC CET 2021) सुरू झाली आहे. मात्र, नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. जवळपास तीन ते चार दिवस वेबसाईटच सुरु होत नसल्याने नोंदणी कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर होता. दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अकरावी सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २६ जुलै पर्यंत होती.

दहावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे ते विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करु शकणार आहेत. मात्र, अद्यापही वेबसाईट बंद असल्याचं समोर आलं आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत असल्याने सीईटी नोंदणीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेले काही दिवस वेबसाईट नोंदणीसाठी बंद ठेवण्यात आली होती. आता, वेबसाईटवर पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अकरावी प्रवेशासाठी सीईटी फॉर्मसाठी ही cet-mh-ssc.ac.in लिंक आहे. या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. २१ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरात कोविड १९ च्या नियमांसह परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येईल.

इंग्रजी, गणित (भाग १ व २), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग १ व २) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी २५ गुणांचे एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. करोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विषयनिहाय २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागेल.

FYJC CET 2021 साठी फॉर्म कसा भराल

अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पण ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे. सीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील पायऱ्यांचा वापर करा-

-महाराष्ट्र FYJC CET 2021 ची अधिकृत वेबसाइट cet-mh-ssc.ac.in वर जा.

-ड्रॉप डाउन मेनूमध्ये आपला बोर्ड निवडा

– नोंदणीसाठी नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचे माध्यम यासारख्या आवश्यक सर्व माहिती भरा..

– त्यानंतर जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा.

– फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि काही दिव्यांग असल्यास त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा.

– इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा.

– खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंट आउट घ्या.

कशी असणार परीक्षा

इयत्ता ११ वीची सामान्य प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावी अभ्यासक्रमावर आधारित असेल.

या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.

या परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध होतील.

ही परीक्षा ऑफलाइन स्वरुपाची असेल आणि प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न असतील.