राज्यात एकीकडे दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने देखील गती घेतल्याचे दिसत आहे. सोमवारी राज्याने पाच लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करत विक्रमाची नोंद केली होती. तर, मंगळवारीच्या लसीकरणामुळे महाराष्ट्राने लसीकरणात दीड कोटींचा टप्पा देखील ओलांडला. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील विक्रमी लसीकरणाबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले होते. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केल्याचे समोर आलं आहे.

महाराष्ट्राने लसीकरणात ओलांडला दीड कोटींचा टप्पा ; आरोग्यमंत्री टोपेंनी केलं ट्विट

“संपूर्ण देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले. आता १ मे पासून १८ ते ४५ हा वयोगट सुद्धा पात्र झाला. कोविशिल्डच्या मे अखेरपर्यंत १० कोटी, कोवॅक्सिनच्या ३ कोटी, तर ऑगस्टपर्यंत ६ कोटी लसी येत आहेत.” असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तसेच, “कल्पना करा की, भारताला लसी आयात कराव्या लागल्या असत्या, तर काय स्थिती असती? भारताने स्वत:ची लस तयार केली, ही खूप मोठी उपलब्धी आहे. एकदम सर्व लस उपलब्ध होणार नसल्याने प्राधान्यक्रम ठरवावाच लागेल.” असं फडणवीस यांनी अमरावती येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

लस मोफत, पण विलंबाने!

केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा करत, लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील दर्शवला आहे. मात्र महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम असल्याने, १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे.