News Flash

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला होता पण…; अजित पवारांनी दिली माहिती

कालच भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहवाल मागवावा अशी मागणी बुधवारी (२४ मार्च २०२१ रोजी) भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन केली. मात्र त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत भेटण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला होता, अशी महिती दिली आहे. मात्र राज्यपाल ‘आऊट ऑफ स्टेशन’ म्हणजे राजभवानावर नसल्याचे कारण देण्यात आल्याने भेट झालेली नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. तिन्ही पक्षांचे प्रमुख राज्यपालांना भेटणार होते. कामकाजाची माहिती दिली जाणार होती. मात्र राज्यपाल हे सध्या बाहेर असल्याचं कळवण्यात आलं. त्यामुळे ते जेव्हा भेटाचा वेळ देतील तेव्हा भेट होईल,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. सामान्यपणे अशा काही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री राज्यापालांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देतात. तशी पंरपराच असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि बदल्यांमधील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गेल्या काही दिवसांपासून मौन का, असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उपस्थित केला. या प्रकरणासंदर्भात भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी राजभवनामध्ये भेटही घेतली. याच वेळी १०० वेगवेगळ्या मुद्यांसंदर्भात आपण तक्रारी केल्याचेही भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं होतं.

सर्व मंत्रीमंडळ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

पोलीस दलासंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख या नात्याने महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची मत जाणून घेतल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या सहकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणी जो काही निर्णय घेतली त्यामध्ये संपूर्ण मंत्रीमंडळ मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

सत्य समोर येईल

जे संभ्रमाचं वातावरण करण्यात आलं त्यामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असा शब्द अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिला आहे. एनआयए, एटीएस या प्रकरणाची चौकशी करत आहे. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. तसेच इतर काही बाबतीत काही चौकशी करणं गरजेचं असेल तर त्या चौकशींसंदर्भातही आदेश दिले जातील, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 1:56 pm

Web Title: maharashtra governer koshyari is out of station so time was not given to cm uddhav thackeray for meeting says ajit pawar scsg 91
Next Stories
1 महा ‘वसूली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता – केशव उपाध्ये
2 पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांचं मोठं विधान
3 “माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि फटकेबाजी”, देवेंद्र फडणवीसांची राजकीय टोलेबाजी!
Just Now!
X