लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

कर्नाटक आणि गुजरातमध्ये १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून पूर्ण आसनक्षमतेने करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याआधी २० जुलैला सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.

काय आहेत अटी –
– बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक
– वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात
– लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापी पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत.

दोन आसनांमध्ये पडदा लावण्याचा प्रस्ताव नाकारला
दरम्यान राज्य सरकारकडून दोन आसनांमध्ये पडदा लावण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंबंधी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यांनी म्हटलं आहे की, “बसमधील दोन आसनांमध्ये पडदा लावणं इष्ट वाटत नाही. तसेच खासगी प्रवासी वाहतूक दोन प्रवाशांमध्ये पडदा लावून होत नाही. विमान व ट्रेनमध्येही पडदे नाहीत. सध्या करोनामुळे वाहतूक क्षमतेच्या १०० टक्के होत नाही. त्यामुळे पडद्याशिवाय वाहतूक करणं योग्य वाटतं”.