गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसूरूंग स्फोटात शहीद झालेल्या १५ जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५  लाख रूपयांची तातडीची मदत व नोकरीच्या कालावधीपर्यंत पूर्ण वेतन दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी येथे दिली.

दुपारी ३  वाजता पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री अंबरीशराव आत्राम, खासदार अशोक नेते उपस्थित होते. या सर्वानी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, या हल्लयाची चौकशी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे स्वत: करीत असून, यंत्रणेत काही उणिवा असल्यास त्या दूर केल्या जातील. पोलिसांसाठी जीव गमवावा लागलेल्या वाहन चालकाच्या कुटुंबाला मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही आर्थिक मदत जाहीर केली नाही. याप्रसंगी जवानांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.

संतप्त कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

शोक अनावर झालेल्या शहीदांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर पोलीस विभाग हाय हाय,पोलीस विभाग मुर्दाबाद अशा घोषणा देत, अधिकारी जवानांना आवश्यक सुविधा पुरवित नसल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या चुकीमुळेच जवान शहीद झाले असाही आरोप अनेकांनी केला.