नागपूर : समाजात श्रीमंत- गरीब असे लोक आहेत. यात काहीजण सुखी आहेत, मात्र त्यांना आनंद मिळत नाही. काहीजण आनंदी आहेत, मात्र त्यांना सुख उपभोगता येत नाही. हे सर्व नकारात्मक विचाराने होते. त्यामुळेच आनंदी माणसांच्या निकषात भारत ११३व्या क्रमांकावर असून ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्यातील जनतेला सुखी, आनंदी, सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक वाढीस लागण्यासाठी आनंद मंत्रालय (हॅपिनेस मिनिस्ट्री) आणण्याचा विचार सरकार करीत आहे. या मंत्रालयाचा आराखडा तयार झाला असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानमंडळाच्या राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात  ‘महाराष्ट्र गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे योगदान’ या विषयावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.

समाधानी आणि आनंदी लोकांच्या देशाच्या क्रमवारीत जगात भूतान पहिल्या तर भारत ११३व्या क्रमांकावर आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार विकास करीत आहे, मात्र यातून जनतेमध्ये आनंद नाही. अनेक रुग्ण असे आहेत की त्यांची सुश्रुषा करण्यास कोणी नसते, यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. रुग्णात आनंद निर्माण करण्यासाठी मनोधारणा महत्त्वाची आहे. देशासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे, अशी भावना तयार करण्यासाठी राज्य शासन समाजातील दु:ख संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सकारात्मकता बाजारात विकत मिळत नाही, सकारात्मकतेचा प्रयोग महाराष्ट्राच्या विकासाला मदत करणारा ठरणार आहे. यामुळे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले. या मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच अन्य वर्गातील लोकांसाठी सहली आयोजित करणे, उद्यानांची निर्मिती करणे, जीवनात आनंद देणारे विविध उपक्रम सुरू करणे आदी कामे केली जाणार आहेत.