करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या नियमांमध्ये थोडी-थोडी शिथीलता येत आहे. सरकारने आतापर्तंत जे जिल्हे ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये होते म्हणजेच जिथे करोना रुग्णांची संख्या कमी आहे किंवा जिथे रुग्णच नाहीत असा जिल्ह्यांना दिलासा दिला होता. तेथील काही दुकाने सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली होती. आता रेड झोनमध्ये राहणाऱ्यांनाही सराकरनं दिलासा दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं टि्वटरच्या माध्यमातून दिलं आहे.

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारनं आता रेडझोनमधील दुकानं उघडण्याची परवानगी दिली आहेत. त्यात दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण, रेड झोनमध्ये असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही सूट लागू नसेल. तेथील दुकाने सध्या उघडता येणार नाहीत.

दुकानं उघडण्यासाठी ही आहे अट
रेड झोनमधील दुकाने उघडताना एका लेनमधील केवळ पाच दुकाने उघडता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना हा नियम असेल. मात्र अत्यावश्यक सेवेत येत असलेल्या जसे की किराणा-मेडिकल या दुकानांसाठी बंधन नाही.

दारू दुकानांसाठी काय आहे नियम
हरित, नारिंगी व लाल या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.