आजपासून २० जिल्ह्य़ांना सूट : मुंबईत नियम कायम; ठाणे, पुण्याला दिलासा

मुंबई : करोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध आज, सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पंचस्तरीय विभागणीनुसार ठाणे शहरात निर्बंधांतील शिथिलता कायम असून, दुकाने नियमितपणे सुरू राहतील. ठाणे ग्रामीणमध्ये तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू आहेत. पुणे शहरात मात्र निर्बंध शिथिल करण्यात आल्याने दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील.

करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण, खाटांची उपलब्धता आणि संसर्गदर या आधारे दर आठवडय़ाला निर्बंध शिथिलीकरणाचे निकष बदलण्यात येतात. आज, सोमवारपासून २० जिल्ह्य़ांमधील निर्बंध पूर्णपणे शिथिल होतील किं वा ते अंशत: शिथिल होतील. मुंबई शहराचा समावेश दुसऱ्या स्तरात झाल्याने निर्बंध कमी होणे अपेक्षित होते, पण गर्दी टाळण्यासाठी तसेच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई शहराला तिसऱ्या स्तरातच ठेवण्यात आले. परिणामी, गेल्या आठवडय़ाप्रमाणेच मुंबईत निर्बंध कायम राहतील आणि दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच खुली राहतील. पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने आज, सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

आठ जिल्ह्य़ांमध्ये दुकाने ४ पर्यंत

ठाणे जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या आठ जिल्ह्य़ांचा तिसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. तिथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत दुकाने खुली राहतील. याशिवाय अन्य निर्बंध लागू असतील. शनिवार-रविवारी दुकाने बंद राहतील. गर्दी टाळण्याकरिता मुंबई शहराचा याच गटात महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी समावेश केला आहे. मुंबईतील जोखीम टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वासाठी रेल्वे सेवा नाही..

मुंबई शहराचा तिसऱ्या स्तरात समावेश करण्यात आल्याने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करता येईल. सर्वसामान्यांना या आठवडय़ात रेल्वे सेवेचा वापर करता येणार नाही. रुग्णसंख्या आणखी कमी होईपर्यंत या महिन्यात तरी सर्वसामान्यांना रेल्वे सेवेचा वापर करण्याची मुभा दिली जाणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

कोकण, प. महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती

– रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त, चौथ्या स्तरात समावेश.

– या जिल्ह्य़ांमध्ये सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू असेल, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव.

– शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदच.

– संसर्ग कमी व्हावा या उद्देशाने अधिक कठोर निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास.

राज्यात करोनाचे १०,४२२ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाचे १०,४२२ नवे रुग्ण आढळले, तर ४८३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत मुंबई ७००, नाशिक जिल्हा ५०२, नगर जिल्हा ६०८, पुणे जिल्हा ७६७, पुणे शहर २६३, पिंपरी-चिंचवड २११, सोलापूर ३९९, कोल्हापूर जिल्हा १५०६, सांगली ८६८, रत्नागिरी ६२०, सिंधुदुर्ग ५६४, सातारा ८२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात सध्या १ लाख ५५ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

अडीच महिन्यांतील मोठी रुग्णघट

देशात गेल्या २४ तासांत ८०,८३४ रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येतील हा अडीच महिन्यांतील नीचांक आहे. सर्वाधिक १५ हजारांहून अधिक रुग्णवाढ तमिळनाडूमध्ये नोंदवण्यात आली. देशात दिवसभरात ३,३०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशात १०.२६ लाख रुग्ण उपचाराधीन आहेत.

सवलत कोणत्या जिल्ह्य़ांना?

नागपूर, अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने काही निर्बंध ठेवल्यास ते लागू असतील. अन्यथा या जिल्ह्य़ांमध्ये आता कुठलेही निर्बंध नसतील. पालघर जिल्ह्य़ाचा दुसऱ्या स्तरात समावेश झाल्याने तेथील बहुतांशी निर्बंध रद्द झाले आहेत.

दिल्ली, तमिळनाडूमध्येही निर्बंध शिथिल

नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करून अर्थचक्रास गती देणारे पाऊल उचलले आहे. दिल्लीत सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सर्व उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. तसेच सर्व मोठी दुकाने, मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुली राहतील, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तमिळनाडूतील २७ जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून आणखी निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.