मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केवळ थापा मारल्या आहेत. विरोधक कर्जमाफीची मागणी करत आहेत, तर मुख्यमंत्री कर्जमुक्तीची घोषणा करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली. कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी सरकारवर टीकेचा प्रहार केला. सिंधुदुर्गला पालकमंत्री आहेत किंवा कसे असा खोचक प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला. सरकार कोकणवर अन्याय करत आहे. सिंधुदुर्ग अधोगतीकडे नेण्याचे काम सरकार करत आहे. सी वर्ल्ड प्रकल्प सरकार सकारात्मक घेत नसून प्रकल्पाची त्यांनी वाट लावली असल्याची टीका राणे यांनी केली. सिंधुदुर्गचा विकास पर्यटनातून करण्यासाठी प्रयत्न केले. पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे पर्यटनातून विकासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता नाही. पर्यटन प्रकल्पाबाबत सरकार उदासीन आहे, असे नारायण राणे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या टीकेला मुंबईत जाऊन उत्तर देणार आहे, पण विरोधक कर्जमाफीची मागणी करत असताना मुख्यमंत्री कर्जमुक्तीची घोषणा करत आहेत. त्यांनी जनतेची दिशाभूल चालविली आहे, असे राणे यांनी सांगून काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आणणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
या वेळी राणे यांनी सरकार, मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचा समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सहा तालुक्यांचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी जाहीर केले. संजू परब (सावंतवाडी), प्रेमानंद देसाई (दोडामार्ग), सुरेश सावंत (कणकवली), दिनेश साळगावकर (कुडाळ), मंदार केणी (मालवण) व भालचंद्र साठे (वैभववाडी) यांची निवड जाहीर केली.