राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. मागील दोन दिवसांपासून कर्मचारी संपावर होते. राज्य कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून संप पुकारला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर व मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याबरोबर बैठका होऊनही काहीही तोडगा निघाला नव्हता. मात्र आज अखेर चर्चेतून तोडगा निघाला असून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

संप मिटविण्याच्या दृष्टीने सरकार व संघटनांच्या स्तरावर प्रयत्न सुरू होते. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली. परंतु त्यात काही तोडगा निघाला नाही, असे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले होते. त्यानंतर सांयकाळी मंत्रालयात मुख्य सचिव जैन यांच्याबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर फक्त चर्चा झाली, निर्णय काहीच झाला नाही, अशी माहिती बृहन्मंबई सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

संपाचा फटका सरकारी कामकाजाला बसला होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती बेताची होती. गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात येणाऱ्या लोकांची गर्दीही रोडावली होती. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु राज्य सरकारने त्यावर समिती नेमून कालहरणाचा प्रयत्न सुरू केला आहे, असा कर्मचारी संघटनांचा आरोप होता. पाच दिवसांचा आठवडा, जुन्या निवृत्ती वेतन योजनेचे पुनरुज्जीवन, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अशाही संपकरी कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या होत्या.

बुधवारी, दुसऱ्या दिवशीही मंत्रालयात संपाचा परिणाम जाणवला. मंत्रालयात ४० टक्के उपस्थिती होती, असे मुख्य सचिवांच्या कार्यालयातून सांगण्यात आले होते. परंतु त्यात अधिकारी वर्गाचाच प्रामुख्याने समावेश होता. अधिकारी संघटनांनी संपातून माघार घेतली होती. साधारणत: सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत मंत्रालयात विविध कामे घेऊन येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढलेली असते. परंतु गेल्या दोन दिवसांत मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याने एरवी गजबजलेले दिसणारे मंत्रालय बुधवारी काहीसे कोमेजल्यागत झाले होते.