राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घटस्थापनेचा मुहूर्त फलदायी ठरला आहे. राज्य सरकारकडून गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. १ जानेवारी २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. यापैकी ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल. तर त्यापूर्वीच्या ७ महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता १३२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता त्यामध्ये आणखी चार टक्क्यांची भर पडली आहे. राज्य सरकारचे तब्बल १६ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली होती. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६१ लाख निवृत्त वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 3:29 pm