अशोक तुपे, श्रीरामपूर

जायकवाडी धरणातील पाण्याची चोरी रोखण्यात आलेले अपयश, योग्य नियोजनाचा अभाव यामुळे मृत पाणीसाठय़ातील तब्बल आठ टीएमसी पाणीवापर करावा लागला. त्यात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच लाभक्षेत्रात कमी पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात पाणी संकट उभे ठाकले आहे.

पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
water shortage news
बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोंचा दंड!
water crises banglore
गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

नाशिक व नगर जिल्ह्य़ातील सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पडणाऱ्या पावसावर धरणे भरतात. नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा, निळवंडे, मुळा, नाशिक जिल्ह्य़ातील दारणा, गंगापूर, मुकणे, कश्यपी, भाम, कडवा हे प्रकल्प भरले की जायकवाडीला पाणी जाऊन मिळते. पाणलोट क्षेत्राबरोबरच नगर व नाशिकच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणीही गोदावरीतून जायकवाडीला जाते. मात्र जुलै संपत आला तरी वरच्या सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्मेच पाणी सर्व धरणांमध्ये आहे. जायकवाडीला गोदावरीतून केवळ दीड टीएमसी पाणी गेले आहे. दरवर्षी जुलैअखेरीपर्यंत ८ ते १० टीएमसी नवीन पाण्याची आवक जायकवाडीत होते. मात्र अनेक वर्षांनंतर यंदा जायकवाडीसाठी गंभीर पाणी संकट उभे ठाकले आहे. जायकवाडीचा मृत पाणीसाठा २६ टीएमसी एवढा आहे. पिण्याकरिता जायकवाडीच्या मृत पाणीसाठय़ातून पाणी उपसा करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत आठ टीएमसी पाणी मृत साठय़ातून वापरण्यात आले आहे. १८ टीएमसी एवढे धरणात पाणी आहे. धरणाच्या इतिहासात प्रथमच मृत पाणीसाठय़ातून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाणी उपसा झाला आहे. मागीलवर्षी जायकवाडीच्या पाण्याचा योग्य वापर न झाल्यामुळे मृत पाणीसाठय़ाचा उपसा करण्याचा प्रसंग आला आहे. नियोजनाचा अभाव, प्रादेशिक अस्मिता, पाण्याचे राजकारण, फुगवटय़ावरील बेकायदा पाणी उपसा, उसाचे वाढलेले क्षेत्र आदी कारणांमुळे धरणातील पाणी वापरलेच, पण मृत साठय़ाचाही वापर करण्यात आला. त्यामुळे यंदा नगर, नाशिकसह मराठवाडय़ालाही पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

जायकवाडीमध्ये मागीलवर्षी ४७ टीएमसी जिवंत पाणीसाठा होता. त्यापैकी सात टीएमसी पाणी पिण्याकरिता वापरण्यात आले. आठ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन, शेतीच्या दोन आवर्तनाकरिता ९ टीएमसी पाणी धरले तरी २४ टीएमसी पाण्याचा वापर होऊन चालूवर्षी पाणी शिल्लक राहायला पाहिजे होते. मात्र यंदा २१ मार्चलाच जिवंत पाणीसाठा संपला अन् मृत पाणीसाठय़ातून पाणी वापरणे सुरू झाले. जायकवाडीच्या फुगवटय़ावर असलेल्या बेकायदा उपसा योजनांनी मोठय़ा प्रमाणात पाणी वापरले. फुगवटय़ावर उसाच्या पिकाचे मळे फुलले. त्यावर आठ साखर कारखान्यांना ऊस उपलब्ध झाला. १९० लाख मेट्रिक टन ऊस जायकवाडीच्या पाण्यावर पिकला. जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे मोठे संकट तर उभे राहिलेच, पण नगर व नाशिक जिल्ह्य़ातील शेतीच उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जायकवाडीचे नियोजन फसलेले असतानाच पावसानेही दगा दिला आहे. नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा, निळवंडे, मुळा तसेच नाशिक जिल्ह्य़ातील गंगापूर, दारणा, मुकणे, कश्यपी इत्यादी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस कोसळत असतो. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, घोटी या भागांत तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. पण यंदा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे दारणा व गंगापूर ही धरणे भरून गोदावरी वाहती झालेली नाही. या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी आहे. भंडारदरा व निळवंडे धरण हे बहुतेक वेळा जुलैअखेरीपर्यंत भरलेले असते. नंतर नदीतून जायकवाडीकडे पाणी झेपावते. पण यंदा गतवर्षीच्या तुलनेत या धरणांमध्ये निम्म्याहून अधिक पाणी कमी आहे. त्यात नगर व नाशिक जिल्ह्य़ात सरासरी सव्वाशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. पेरण्या रखडलेल्या आहेत. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण झालेले नाही. आजही कूपनलिका आणि विहिरी कोरडय़ा पडलेल्या आहेत. अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये जर पावसाने साथ दिली तर नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणे भरतील. मात्र समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडीला यंदा पाणी सोडावेच लागणार आहे. जायकवाडीतून अनिर्बंध उपसा रोखला असता तर हे प्रमाण कमी असते. पण यंदा अधिक पाणी जायकवाडीला जाणार आहे.

मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष

जायकवाडी धरणात चालू पावसाळ्यात गोदावरी नदीतून सुमारे दीड टीएमसी पाणी गेले. गोदावरी नदीपात्रात कमालपूर (ता. श्रीरामपूर) येथे पाण्याचे मोजमाप झाले असता दीड टीएमसी पाणी दाखविले गेले. मात्र जायकवाडीच्या भिंतीजवळ पाणी मोजले असता अवघी १८० दशलक्ष घनफूट आवक दिसली. सुमारे सव्वा टीएमसी पाणी धरणात पोहोचले, पण त्याचा हिशोबच लागत नाही. फुगवटय़ावरच उसाच्या पिकाला ते वापरले गेले. १९८५ च्या जायकवाडीच्या फुगवटय़ाच्या पाणी नियोजनात २३.५० टीएमटी पाण्याचे बाष्पीभवन गृहीत धरले होते. २०१८ मध्ये फेरनियोजन केले असता ते ११ टीएमसी बाष्पीभवन दाखविण्यात आले. १२ टीएमसी बाष्पीभवन कमी केले. अशाप्रकारे जायकवाडीच्या पाण्याचा हिशोबच लागत नाही. प्रादेशिक वादात मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

जायकवाडीच्या अनिर्बंध पाणी वापर, नियोजनाचा अभाव, अकार्यक्षमता आदी प्रश्नांवर भंडारदरा, निळवंडे संघर्ष समितीने जलसंपत्ती नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. धरणाच्या फुगवटय़ावरील पाणी उपसा रोखण्यात अपयश आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उसाचे मळे फुलले. पण नाशिक-नगरमध्ये भुसार पिकाची शेतीही अडचणीत आली. या प्रश्नाकडे प्रादेशिक वादाचा विचार न करता नियोजनातून बघितले पाहिजे. अन्यथा जनक्षोभ होईल.

– उत्तम निर्मळ, निवृत्त अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

समन्यायी पाणी वाटपात धरणातील पाणी मोजले जाते, पण पडणारा पाऊसही मोजला पाहिजे. मराठवाडय़ात चांगला पाऊस पडतो. नगर, नाशिक पर्जन्यछायेखाली येते. जायकवाडी धरण हे आठमाही आहे. पण धरणाचे पाणी बारमाही पिकाकरिता वापरले जाते. संपूर्ण मराठवाडय़ाला नाही, तर अवघ्या दोन तालुक्यांनाच फायदा होतो. प्रादेशिक वादात शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. अनिर्बंध पाणी उपशाला लगाम घातला नाही तर नगर, नाशिकची शेती उद्ध्वस्त होईल.

– दौलतराव पवार, माजी आमदार, पाणी प्रश्नाचे अभ्यासक