भाजपाने पाच वर्षांत जी आश्वासने दिली त्यातले एकही पूर्ण केलेले नाही. या सरकारने फसवलं अशी मानसिकता या देशातील आणि राज्यातील जनतेची झाली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी मुदाळ येथील सभेत सरकारवर टीका केली. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, मल्ल्या हे देशाचे हजारो कोटी बुडवून फरार झाले परंतु आपण थोडेसे जरी कर्ज थकवलं तर ठेवतील का सर्वसामान्य लोकांना? असा सवालही आमदार जयंत पाटील यांनी केला.

पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो मोदी म्हणाले… देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आरक्षण देतो सांगितले. मोदी आणि फडणवीस यांना ‘पहिली कॅबिनेट’ हा रोग लागला आहे असाही आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. एवढी खोटी आश्वासने देणारा देशाचा पंतप्रधान मी पाहिला नाही अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी पंतप्रधान यांच्या घोषणांचा समाचार घेतला.

नियोजन आयोगाचे अधिकार मोडीत काढला. नियोजन आयोग असता तर बुलेट ट्रेन करायला परवानगी दिली नसती, सीबीआयची वाट लावली, रिझर्व्ह बॅंकेच्या कारभारात ढवळाढवळ केली असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला. पाच राज्यात पराभव झाल्यानंतर भाजपने सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण देता येत नाही हे माहित असूनही आरक्षण दिले. हे सगळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.

एका बाजूला शेतीचा खर्च वाढतोय आणि पिकवलेल्या शेतीला बाजारभाव मिळत नाहीय. त्यामुळे हे सरकार बदलायचे आहे त्यासाठी ही परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे असे सांगतानाच भुदरगड, राधानगरी, आजरा या तालुक्यातील आणि परिसरातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन आमदार जयंत पाटील यांनी दिले.