सत्तेवरून पायउतार होऊन विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपावर शिवसेनेकडून उपदेशाचे बाण सोडणे सुरूच आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीवरून शिवसेनेनं भाजपाला कायद्यानं राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीकडं बहुमताचा आकडा नाही, असं म्हणणाऱ्यांनाही शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. “विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री ‘टेकाडा’सारखा दिसतो तसेच हे बहुमताच्या बाबतीत झाले,” असं सेनेनं म्हटलं आहे.

अनेक नाट्यमय आणि उत्कंठावर्धक घडामोडींनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले. त्यानंतर बहुमताच्या आकड्यावरून भाजपानं महाविकास आघाडीकडं बहुमत नसल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीवेळी नियमांवर बोट ठेवत सभात्याग केला होता. या सर्व घडामोडींवर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारचे बहुमत काठावरचे नाही, तर चांगले दणदणीत आहे. सरकारच्या बाजूने १७० आमदारांचे बळ आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतोच, पण फडणवीस यांच्या पाळीव पिलावळीच्या चष्म्यांतून आकडा १३०च्या वर जायला तयार नव्हता. विचारांची झेप घ्यायची कुवत नसली की अनेकांना सह्याद्री ‘टेकाडा’सारखा दिसतो तसेच हे बहुमताच्या बाबतीत झाले. १७०चा आकडा पाहून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने विधानसभेतून पळ काढला. रविवारी विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवडदेखील बिनविरोध झाली. शनिवारचा ‘१७०’ आकडा बहुधा भाजपवाल्यांच्या डोळय़ांत व डोक्यांत घुसल्याचा परिणाम असा झाला की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यांना माघार घ्यावी लागली. आता पुढील पाच वर्षे त्यांना अशा माघारीची सवय ठेवावी लागेल,” असं शिवसेनेनं म्हटलं.

‘फडणवीस एके फडणवीस’

“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान व प्रतिष्ठा राहावी अशी आमची इच्छा आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत मामला आहे की, कुणाला विरोधी पक्षनेता करायचे किंवा कुणाला आणखी काय करायचे, पण राजस्थानात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले नाही. तेथे माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या काही विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीवर बसल्या नाहीत. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारचा पराभव झाला. तेथेही बलाढय़ मानले गेलेले शिवराजसिंह चौहान हे विरोधी पक्षनेते बनले नाहीत व पक्षाच्या अन्य नेत्यांनी ते पद स्वीकारले. महाराष्ट्रात मात्र दिल्लीवाले ‘फडणवीस एके फडणवीस’ करीत आहेत यामागचे रहस्य नेमके काय ते समजून घ्यावे लागेल,” असा मार्मिक टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला.