12 November 2019

News Flash

दुष्काळसंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं केला व्हॉट्स अॅपचा वापर

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला सरकारच्या कामांचा लेखाजोखा

(संग्रहित छायाचित्र)

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, दुष्काळ, राज्यावरील जल संकट, चार छावण्या, जल सिंचन योजना आदींबाबत सरकारच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

राज्य सरकारला दुष्काळ काळात केंद्र सरकारने मोठी मदत केली असल्याचे सांगत, २४ जिल्ह्यात ४ हजार ४६१ कोटींचं अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तर शेतक-यांच्या दुष्काळसंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं व्हॉट्स अॅपचा वापर केला असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच, राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शिवाय शेळी आणि मेंढी यांच्यासाठी चारा छावण्या उभारण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जल संकटावर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. चार वर्षांत १४० सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या असल्याचे सांगत ८ हजार ९४६ कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद तर कृषी सिंचन योजनेसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चार कृषी विद्यापिठांसाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात येत आहे. जमिन महसूलात सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे हे विशेष निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शिवाय राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढही केली गेली आहे. बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता रूपये १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद आहे. सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने बावनथडी मुख्य प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझरा मध्यम प्रकल्प व उर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश आहे.

First Published on June 18, 2019 2:53 pm

Web Title: maharashtra government has used the whats app for drought related complaints msr 87