राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये लवकरच हायटेक होणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून यासाठी ई-रुग्णालय ही संकल्पना राबवली जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर अलिबाग आणि नाशिक या दोन रुग्णालयाांत ही संकल्पना राबवली जाणार असून हळूहळू राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचा यात समावेश केला जाणार आहे.
राज्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयांचा कारभार सुसूत्रता यावी आणि रुग्णांवरील उपचाराचे योग्य डॉक्युमेंटेशन व्हावे यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहे. चंदिगढमधल्या पी. जी. इन्स्टिटय़ूटच्या धर्तीवर राज्यातील शासकीय रुग्णालये विकसित केली जाणार आहेत. या योजनेला ई-रुग्णालये असे नाव देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालयाचे संगणकीकरण केले जाणार आहे. सिडॅक या संस्थेकडून रुग्णालयांसाठी ई-सुश्रुत नावाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये रुग्ण रुग्णालयात आल्यापासुन, त्याच्यावर करण्यात आलेला उपचार, त्याच्यावर करण्यात आलेल्या चाचण्या आणि त्याला देण्यात आलेले औषध हा सगळा डेटा संगणकात संकलित केला जाणार आहे.
रुग्णाला कुठेही कागदपत्र घेऊन नाचवायची गरज पडणार नाही. पेपरलेस प्रशासन संकल्पनेमुळे केसपेपरची जागा ई-पेपर घेणार आहे. रुग्णालय प्रमुखांना आपल्या केबिनमध्ये बसून संपूर्ण रुग्णालयातील ओपीडीवर लक्ष ठेवता येणार आहे. राज्यात सुरुवातीला दोन रुग्णालयांत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्व रुग्णालयांचे ई-रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे.
येत्या २७ आणि २८ जूनला राज्याच्या आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक होणार आहे. त्यांनतर अलिबागच्या रुग्णालयाच्या संगणकीकरणाला सुरुवात होणार असल्याचे अलिबागचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पाटील यांनी सांगीतले. सिडॅक संस्थेकडून जिल्हा रुग्णालयाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. सिडॅककडून लवकर ३० ते ३५ संगणक बसवण्यात येणार आहेत. योजनेमुळे रुग्णालयाच्या कारभारात अधिक सुसूत्रता येईल आणि रुग्णाच्या उपचारांचे डॉक्युमेंटेशन योग्य प्रकारे होईल असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.