परीक्षेआधी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याचे निर्देश

मुंबई : राज्यातील विद्यापीठांनी अधिकार मंडळांच्या संमतीने अंतिम वर्षांच्या परीक्षांची तयारी केली असली तरी विद्यापीठे आणि परीक्षांच्या नियोजनात अद्यापही शासकीय ढवळाढवळ सुरूच आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नसंच उपलब्ध करून देऊन त्यातीलच प्रश्न विचारावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केल्यानंतर उच्चशिक्षण विभागाने प्रश्नसंच देण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले.

परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देणे योग्य नाही, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निकषांनुसार परीक्षा घ्याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर राज्यातील विद्यापीठांनी अंतिम वर्षांच्या परीक्षांची तयारी सुरू केली. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षांबाबतचे निर्णय विद्यापीठांनी त्यांच्या अधिकार मंडळांच्या संमतीने घेणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यापीठांनी अधिकार मंडळांच्या बैठकीत परीक्षांचा आराखडा निश्चित करून शासनाला सादर केला. कुलपतींनीही त्याला समंती दिली. मात्र, त्यानंतरही विद्यापीठांचे कामकाज आणि परीक्षांच्या नियोजनातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाची ढवळाढवळ संपलेली नाही. बहुतेक विद्यापीठांनी बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात ऑनलाइन माध्यमातून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. बदललेल्या परीक्षेचे स्वरूप कसे असावे, याची विद्यार्थ्यांना कल्पना येण्यासाठी सराव चाचण्यांचेही नियोजन केले. मात्र, आता परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याचा फतवा उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. ‘विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील. कुलगुरूंना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रविवारी जाहीर केले.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणाले..

‘परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भावना आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडली. मात्र, न्यायलयाने परीक्षा घ्याव्यात, असे आदेश दिले. त्याचा आदर ठेवून आता परीक्षा द्याव्या लागतील. कुलगुरूंनी शिफारस केलेल्या पर्यायांनुसारच शासनाने निर्णय जाहीर केला. प्रश्नसंच मिळणार का, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात होती. त्याविषयी नुकतीच कुलगुरूंशी चर्चा केली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागे शासन उभे आहे याची जाणीव करून देण्यासाठी सर्व विद्यापीठांचा सोमवारपासून दौरा करणार आहे.

विद्यार्थी संघटनांपुढे नमते

’अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास सत्ताधारी शिवसेनेची विद्यार्थी संघटना युवासेनेने विरोध केला होता. त्यानंतर शासनानेही परीक्षा न घेताच अंतिम वर्षांचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

’सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय मागे घेत राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षांची तयारी सुरू झाली. मात्र, आता परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देऊन त्यातील प्रश्न विचारण्याची मागणी युवासेनेसह काही विद्यार्थी संघटनांनी केली.

’विद्यार्थी संघटनांनी मागणी करताच पुन्हा एकदा संघटनांसमोर नमते घेत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देण्याच्या सूचना कुलगुरूंना दिल्या आहेत.