मुंबई :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सनदी आणि महसूल अधिकाऱ्यांसोबतच राज्य सरकारने पोलीस दलातही मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली असून सोमवारी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील यांची तर तेजस्वी सातपुते यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी, ईशू सिंधू यांची अहमदनगर पोलीस अधीक्षकपदी, पंजाबराव उगले यांची जळगाव पोलीस अधीक्षक तर विनीता साहू यांची गोंदिया जिल्हा अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी सुहास वारके, औरंगाबाद पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षकपदी रविंदर सिंघल, नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पी.पी. मुत्याल, गुन्हे अन्वेषण विभागाच्या महानिरीक्षकपदी एफ. के. पाटील तर राज्य सुरक्षा मंडळाच्या महानिरीक्षकपदी सुनील रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता कराळे यांची अप्पर आयुक्त ठाणे, पी. आर दिघावकर यांची महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून परतलेल्या जयंत नाईकनवरे यांची दहशतवादविरोधी पथकाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय दराडे यांची विक्रीकर उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.  हरीश बैजल यांची राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ६- धुळे येथे समादेशकपदी, अरविंद साळवे यांची भंडारा पोलीस अधीक्षकपदी, पंकज देशमुख यांची पुण्यात उपायुक्त म्हणून, दत्ता शिंदे यांची विद्युत वितरण कंपनीत अधीक्षकपदी, सुनील कडासने यांची नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी, संदीप पखाले यांची  बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून तर राज्य मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी अब्दुल रेहमान यांची बदली केली आहे.

अश्विनी जोशी यांना धक्का उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांची सरकारने मुंबई एड्स नियंत्रण सोसायटी मुंबईच्या प्रकल्प संचालकपदी बदली केली आहे. आधी मुंबईच्या जिल्हाधिकारी म्हणून आणि आता उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कारवायांमुळे जोशी मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात व्यक्त केलेली नाराजी आणि व्यक्त उत्पादन शुल्क मंत्र्यांशी निर्माण झालेल्या विसंवादामुळे सरकारशी जवळीक असूनही निवडणुकीच्या तोंडावर वाद नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी जोशी यांना महत्त्वाच्या पदावरून दूर केल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे ओमप्रकाश देशमुख यांची भूमी अभिलेख विभागात उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे.