वीजनिर्मिती आणि मागणी यातील तफावत दूर करण्याच्या प्रयत्नात जेरीस आलेल्या ‘महावितरण’ने गेल्या पाच वर्षांत वितरण हानी तब्बल १० टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवले असले, तरी राज्यातील सुमारे पंधराशे फिडर्सवर मोठय़ा प्रमाणावर होणारी वीज गळती रोखण्यात न आल्याने भारनियमनाचे संकट कायम आहे. गेल्या सहामाहीत राज्यभरातील सरासरी वितरण हानी १२.८ टक्के होती. सर्वाधिक १८.६ टक्के विजेचे नुकसान औरंगाबाद परिमंडळात आहे.
ताज्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च ते ऑगस्ट या सहामाहीत राज्यातील वीज वितरण हानी १.३ टक्क्यांनी कमी झाली आहे. २००५-०६ मध्ये राज्य वीज मंडळाच्या पुनर्रचनेच्या वेळी वितरण हानी ३५ टक्क्यांपर्यंत पोचली होती. ‘महावितरण’ अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या वर्षांतच ही तूट ३.१६ टक्क्यांनी कमी झाली होती. २००७-०८ मध्ये ती २२ टक्क्यांपर्यंत खाली आली. वीज हानीसाठी बहुतांश वीज चोरी कारणीभूत आहे. बंद असलेले किंवा सदोष मीटर, जुन्या झालेल्या तसेच अतिभारीत वाहिन्या, बिघाड असलेले ट्रान्सफॉर्मर्स यामुळेही वीज हानी वाढते. महावितरण कंपनीने फोटोमीटर रिडिंग, वीज चोरीविरुद्ध मोहीम, कृषी स्वाभिमान योजना असे निर्णय घेतल्याने वीज हानी कमी होण्यात यश मिळाले, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यभरात सुमारे २.१४ कोटी वीज ग्राहक आहेत. त्यात कृषीपंपधारकांची संख्या ३५ लाख ५५ हजार आहे. महावितरण कंपनीच्या व्यवस्थेत एकूण ७ हजार ८९६ फिडर्सवरून ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यापैकी अ, ब, क, ड या श्रेणीतील सुमारे ३ हजार ५८८ फिडर्स भारनियमनमुक्त आहेत. मात्र, अजूनही १ हजार ४८९ फिडर्सवर भारनियमन सुरू आहे. शहरी भागात ४२ टक्क्यांपेक्षा, तर ग्रामीण भागात ४५ टक्क्यांहून अधिक वीज गळती असलेल्या फिडर्सवर भारनियमन केले जाते. राज्यात विजेची उपलब्धतता १३ हजार ५०० ते १४ हजार मेगाव्ॉट आहे. अजूनही सुमारे पाचशे ते सहाशे मेगाव्ॉटची तूट आहे. वीज चोरी करणारे नामानिराळे राहून प्रामाणिक ग्राहकांनाही भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असतानाही देखभालीअभावी अनेक भागात वितरण यंत्रणा मोडकळीस आली आहे. अनेक कामे प्रलंबित आहेत. कामांच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज्यात सर्वाधिक १८.६ टक्के वितरण हानी औरंगाबाद परिमंडळात असताना त्याखालोखाल विजेचे नुकसान कोकण परिमंडळात आहे. या भागात हानी १८.१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत औरंगाबाद परिमंडळात १६.९ टक्के, तर कोकण परिमंडळात १९.८ टक्के वीज हानी होती. औरंगाबाद परिमंडळातील वितरण हानी १.७ टक्क्यांनी वाढली आहे. कोकणातील हानी मात्र कमी झाली आहे.

परिमंडळनिहाय  वीज वितरण हानी
अमरावती    – १६.९ टक्के
औरंगाबाद    – १८.६ टक्के
बारामती    – १३.० टक्के
भांडूप    – १३.७ टक्के
जळगाव    – १२.५ टक्के
कल्याण    – १०.८ टक्के
कोकण    – १८.१ टक्के
कोल्हापूर    – ११.७ टक्के
लातूर    – १७.८ टक्के
नागपूर शहर- १२.२ टक्के
नागपूर    – १०.५ टक्के
नाशिक    – १२.६ टक्के
पुणे    – ८.२ टक्के