राज्यासमोर करोनाचं संकट ओढवलेलं असताना शिक्षण विभागानं त्यातून मार्ग काढत शाळा सुरू करण्याचा कृती कार्यक्रम तयार केला होता. शैक्षणिक वर्ष व शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आणखी वाचा- इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी ऑनलाइन वर्ग नाही

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,”करोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याशीही आपण खेळू शकत नाही, हे लक्षात घेऊन करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसेच शहरांपासून दूर असलेल्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात याव्या. याचबरोबर ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करावी. एकवेळ शाळा सुरू झाल्या नाही तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक वर्षाला सुरूवात करण्यासाठी संमती दिली. या बैठकीला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे उपस्थित होते.

आणखी वाचा- राज्यात पुढील महिन्यापासून शाळा सुरु, असं असेल प्रत्येक वर्गाचं टाइमटेबल

कसं आहे शैक्षणिक वर्षाचं नियोजन?

रेड झोनमध्ये नसलेल्या ९ , १० १२ वी शाळा-महाविद्यालय जुलैपासून, ६ वी ते ८ वी ऑगस्टपासून, वर्ग ३ ते ५ सप्टेंबरपासून, वर्ग १ ते २ री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही, तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने डिजिटल शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी, असे मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.