28 November 2020

News Flash

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

परीक्षा शक्यतो ऑनलाइन घेण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले आहेत. विद्यार्थ्यांवर दबाव येऊ नये यासाठी कमी गुणांची परीक्षा असेल असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं स्पष्ट केलं आहे. तसंच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “युजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. युजीसीने ही मागणी मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे”.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन बुधवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत,” अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.

“परीक्षा नेमकी कधी सुरु होईल अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की, आज परीक्षा जाहीर केली आणि उद्या घेतली असं होणार नाही. पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्याासासाठी दिला जाईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

“विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार नाही यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांना शारिरीक आणि मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली. त्यानुसार पेडणेकर समिती चांगल्या पद्धतीनं काम करत असून कार्यवाही करत आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“कुलगुरु आणि समितीच्या लोकांनी बैठक आणि चर्चेसाठी अजून एक दिवस देण्याची विनंती केली आहे. परीक्षा कशी पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाणार आहे,” असं उदय सामंत यांनी सांगितलं. “विद्यार्थी घराबाहेर पडणार नाही, घरातच परीक्षा देता आली पाहिजे यावर कुलगुरुंच एकमत झालं आहे. ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची करोना संकटात परीक्षा घेणं फार जिकीरीचं काम आहे. मात्र कुलगुरु हे योग्य पद्धतीने पार पडेल याबद्दल आशा आहे,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 3:46 pm

Web Title: maharashtra government on final year exams ugc guidelines supreme court sgy 87
Next Stories
1 अभिनेत्री कंगना रणौतला संजय राऊत यांनी सुनावलं; म्हणाले…
2 राज्यातील मंदिरं खुली करणार, उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकरांचं आंदोलन मागे
3 “…तर महाराष्ट्रावर उपकार होतील,” प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनावर संजय राऊत यांची टीका
Just Now!
X