‘लोकसत्ता’च्या वृत्ताचा परिणाम

तुकाराम झाडे, लोकसत्ता        

हिंगोली : मुलाला वीरमरण आल्यानंतर हलाखीचे जीवन जगणाऱ्या वीरमातेची कहाणी ‘लोकसत्ता‘मध्ये प्रसिद्धी झाल्यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून चार एकर जमीन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. टाळेबंदीच्या काळातील या महिलेच्या जगण्यासाठी सुरू असणारी ससेहोलपट पुढे आल्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह समाजातील अनेकांनी तातडीची मदत केली. मात्र, मृत जवानाच्या आईला कायमस्वरूपी मदत मिळावी म्हणून खासदार राजीव सातव यांनी पुढाकार घेत जमीन देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आणि तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे विशेष बाब म्हणून चार एकर जमीन रुक्मिणीबाई भालेराव यांच्या नावे करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असणाऱ्या पिंपळदरी येथील जवान कविचंद परसराम भालेराव यांना ६ जुलै २००२ रोजी सीमा सुरक्षा दलात कर्तव्य बजावताना जम्मू-काश्मीर भागातील अनंतनाग येथे वीरमरण आले होते. जिल्ह्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने जवानाच्या पश्चात त्यांची आई रुक्मिणीबाई भालेराव ह्य अतिशय हलाखीचे जीवन जगत होत्या. जगण्याची भ्रांत असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नंतर त्यांच्यापर्यंत किराणा व गरजेच्या वस्तू पोहोचविल्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी किराणा दुकानदारास ऑनलाइन पैसे पाठवून जगण्याची भ्रांत मिटविली. नातवासह आयुष्य काढणाऱ्या आजी रुक्मिणीबाईंची कथा अस्वस्थ करणारी असल्याने खासदार राजीव सातव यांनी भूमिहीन महिलेस जमीन देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार दारिद्रय़रेषेखालील व्यक्तीलाच जमीन दिली जाईल, अशी अट शिथिल करून जमीन नावे करून देण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.