शासनाकडून मुंबई बंदर बंद करण्याचा घाट रचला जात असून, ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे बंदर वाढवणला हलवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मंगळवारी आमदार कपील पाटील यांच्यासह अनेक आमदारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले.
आंदोलनात आमदार निरंजन डावखरे, हेमंत टकले, आनंद ठाकूर यांच्यासह अनेक आमदारांचा सहभाग होता. कपिल पाटील म्हणाले, मुंबई बंदराची जागा मोक्याची आहे. त्यावर अनेक मोठय़ा विकासकांचा डोळा आहे. ही जागा मिळावी म्हणून बिल्डर लॉबीकडून ते इतरत्र स्थानांतरित करून ती जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तेव्हा हे बंदर स्थानांतरित करण्यासाठी वाढवण येथे बंदर तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परंतु असे झाल्यास अनेक जण बेरोजगार होतील. सोबत वाढवण येथील स्थानिकांना विविध समस्यांना समोर जावे लागेल. तेव्हा तातडीने शासनाने हे बंदर बंद करण्याच्या हालचाली थांबवाव्यात अशी मागणी लावून धरण्यात आली.