गोसीखुर्दचे पाणी देण्याचा प्रस्ताव

नागपूर : गोसीखुर्दचे पाणी सिंचन आणि पिण्यासाठी वापरण्याचे बंधन असल्याने एकीकडे मौदा एनटीपीसीला पाणी मिळणार नसल्याची नोटीस बजावली असताना दुसरीकडे याच धरणाचे पाणी उमरेडजवळ प्रस्तावित दोन औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने वीजनिर्मिती प्रकल्पांना धरणाचे पाणी देण्यास मज्जाव केला आहे. त्याऐवजी सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करून या प्रकल्पांनी पाणी वापरावे, असे धोरण ठरवले आहे. त्यानुसार मौदा एनटीपीसीला पाच वर्षांनी गोसीखुर्द धरणाचे पाणी देणे बंद करण्यात येणार आहे, परंतु याच धरणाचे पाणी महाजनकोच्या उमरेडनजीक प्रस्तावित दोन औष्णिक वीज प्रकल्पांना देण्याचे ठरले आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, भांडेवाडी येथे पुनप्र्रक्रिया केलेले पाणी आणि गोसीखुर्द धरणाचे पाणी या दोन्ही प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.

उमेरड तालुक्यातील गोकुल आणि पिराया गावाजवळ महाजनकोचे दोन औष्णिक वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पात प्रत्येकी ८०० मेगाव्ॉट वीजनिर्मिती केली जाईल. या प्रकल्पांचा प्रस्ताव पर्यावरण खात्याच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने राज्यातील सर्व २५ वर्षे जुने औष्णिक वीज प्रकल्प मोडीत काढण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्याची भविष्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे दोन औष्णिक वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. यासाठी उमेरडजवळील वेस्टर्न कोलफिल्डची जागा निश्चित करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी २८ दशलक्ष घनमीटर पाणी वर्षांला लागणार आहे. यापैकी १३ दशलक्ष घनमीटर पाणी गोसीखुर्द आणि १५ दशलक्ष घनमीटर पाणी महापालिकेच्या भांडेवाडी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून घेण्यात येणार आहे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सध्या मौदा एनटीपीसीला १०० दशलक्ष घनमीटर पाणी दिले जात आहे. गोसीखुर्दच्या पाण्यावर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. या धरणाची निर्मितीच सिंचनासाठी झाली आहे. धरणाचे पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी देण्याचे प्राधान्य आहे. यामुळे एनटीपीसीला पाच वर्षांनंतर गोसीखुर्दचे पाणी दिले जाणार नाही, अशी नोटीस देण्यात आली आहे.

सध्या महापालिकेच्या भांडेवाडी येथे नागपुरातील सांडपाण्यावर पुनप्र्रक्रिया करण्यात येत आहे.

येथील महापालिकेच्या युनिटमध्ये दररोज १३० दलघमी आणि महापालिकेच्या युनिटमध्ये ७० ते ८० दलघमी पाण्यावर पुनप्र्रक्रिया केली जात आहे.

२८ दशलक्ष घनमीटर पाणी

उमरेड येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येकी २८ दशलक्ष घनमीटर पाणी वर्षांला लागणार आहे. यापैकी १३ दशलक्ष घनमीटर गोसीखुर्द आणि १५ दशलक्ष घनमीटर महापालिकेकडून घेण्याची योजना आहे.

‘‘राज्याला भविष्यात लागणाऱ्या विजेची गरज भागवण्यासाठी उमरेडजवळ दोन औष्णिक वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. ही जागा निवडवण्याचे कारण म्हणजे नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी आणि आंभोरा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी वीज प्रकल्पांना घेणे सोयीचे होणार आहे.’’

– चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री