सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचं तातडीने लसीकरण करण्यात यावं अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. थोरात यांनी यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन थोरात यांनी ही माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे.

तसंच मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात थोरात यांनी अन्य काही राज्यांचे दाखलेही दिले आहेत. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही याबाबतचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे.