शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि पाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर मोदी सरकार आणि राज्यातील भाजपा नेत्यांविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेचा सूर लावला. महाराष्ट्रात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा असेल, तर राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक आहे. सीबीआयला राज्यात येण्यापासून रोखण्यात आलं असल्याने आता केंद्र सरकार आणि भाजपाचे नेतेमंडळी ‘ईडी’ला हाताशी घेऊन सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाजवळ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘ईडी’च्या आडून भाजपा सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे. भाजपा नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ‘ईडी’ची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला CBI करत होते. पण, राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने CBIबाबत आता केंद्र सरकार काहीच करु शकत नाही. अशा परिस्थितीत राजकीय सूडाच्या भावनेने ‘ईडी’च्या मदतीने कारवाई केली जात आहे. ज्या पध्दतीने ‘ईडी’चा राजकारणासाठी वापर होतोय, ते पाहून अशा प्रकारचे राजकारण देशात कधीही पाहण्यात आले नव्हतं”, असंही देशमुख म्हणाले.