संचालनालय स्तरावर डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात होरपळणाऱ्या अतिमागास गडचिरोली जिल्हय़ात १०० ते १५० प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोलीत वैद्यक महाविद्यालय सुरू करता येईल किंवा कसे याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालय स्थापनेच्या दृष्टिकोनातून प्राथमिक तपासणी कण्यासाठी संचालनालय स्तरावर डॉ. राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून सात दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

नक्षलवाद, आदिवासी अति मागास जिल्हा अशी गडचिरोलीची सर्वत्र ओळख आहे. एकही उद्योग नसल्याने येथे बेरोजगारांची प्रचंड मोठी फौज तयार झाली आहे. अशा स्थितीत गडचिरोलीचा विकास करण्यासाठी येथे नवीन शासकीय वैद्यक महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष दिले आहे. विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले यांनी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी गडचिरोलीत वैद्यक महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्याच पत्राचा आधार घेत वैद्यक महाविद्यालय सुरू करता येईल किंवा कसे, याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्या दृष्टीने प्राथमिक तपासणी करण्यासाठी संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबईने प्रा. डॉ.राजेंद्र सुरपाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये प्रा.डॉ.शैलेश धवने, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर अशी तीन जणांची समिती गठित केली आहे. या समितीने गडचिरोली जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन विविध मुद्यांच्या अनुषंगाने माहिती संकलन करून शासनाला पाठवावी, असे म्हटले आहे. यामध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या मानांकनाप्रमाणे शासकीय रुग्णालय उपलब्ध आहे का व त्यांची रुग्ण खाटांची संख्या, गेल्या तीन वर्षांतील रुग्णांची संख्या, उपलब्ध रुग्णालय चालू स्थितीत आहे काय, रुग्णालय कोणत्या विभागाचे आहे, त्याला निधी उपलब्ध आहे काय, मनुष्यबळ मंजूर आहे काय, वेतनाची तरतूद केली आहे काय, रुग्णालयाचे एकूण बांधकामाचे क्षेत्रफळ, २५ एकर जागा उपलब्ध आहे काय, असल्यास सदर जागा कोणत्या विभागाच्या अखत्यारित आहे, शासकीय रुग्णालयापासून किती अंतरावर आहे. जागेचे छायाचित्र, नकाशे तसेच महसूल विभागाकडील सव्‍‌र्हेनंबरचे नकाशे उपलब्ध करून घ्यावेत, तसेच इतर आवश्यक सोयींचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हा सविस्तर अभिप्राय येत्या १५ दिवसांच्या आत संचालनालयास पाठवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून तसेच संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्याकडून गडचिरोलीत शासकीय वैद्यक महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने अहवाल सादर करण्याचे पत्र मिळाले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात गडचिरोलीत जाऊन संपूर्ण माहिती गोळा करून अहवाल सादर करू.

– डॉ. एस.एस. मोरे,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर