पर्यटन, पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर; आराखडय़ास मंजुरी

मुंबई शहर व उपनगरासह कोकण विभागाच्या सर्व जिल्ह्य़ांतील पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कौशल्य विकास, तंत्रशिक्षण आदी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्याचा तसेच यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण विभागातील रायगड, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्य़ांच्या वार्षिक योजनांसंदर्भात संबंधित पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री व राज्याचे वित्त-नियोजनमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत  संबंधित जिल्ह्य़ांनी तयार केलेल्या जिल्हा वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली. संबंधित जिल्ह्य़ांचा मानव विकास निर्देशांक, शहरी व ग्रामीण लोकसंख्या, क्षेत्रफळ आदी निश्चित निकषांच्या आधारे वार्षिक योजनेंतर्गत निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे वित्त व नियोजनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा विकास योजनेंतर्गत निधी – अजित पवार

कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन ‘मुंबई २४ तास’ संकल्पना राबवण्यात येईल, गेटवे ते मांडवा स्पीडबोट सेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक, विद्यार्थी वसतिगृहे, माळशेज घाट परिसरात निसर्ग न्याहाळण्यासाठी ‘ग्लास ब्रीज’ आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. जिल्हा विकास योजनेंतर्गत पुरेसा निधी उपलब्ध करण्यात येईल व या निधीत कपात केली जाणार नाही, निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व लोकांच्या गरजा विचारात घेऊन व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

* मुंबईसह ठाणे व कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्य़ांमध्ये ऐतिहासिक महत्त्व, जागतिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू तसेच निसर्गसंपन्न पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटनस्थळांचा ‘हेरिटेज’ दर्जा कायम ठेवून त्यांचं सौंदर्य वाढवण्यावर आणि त्याद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यावर राज्य शासनाचा भर असेल.

* मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व जागतिक पर्यटन केंद्र आहे. इथल्या ऐतिहासिक वास्तूंची सौंदर्यवृद्धी केल्याने मुंबईचे पर्यटन आकर्षण वाढेल. त्यासाठी मुंबईतील नद्यांची स्वच्छता व किनाऱ्यांचे सुशोभीकरण, शहरात हेरिटेज वॉक, महिलांसाठी स्वच्छतागृहे आदी सुविधा निर्माण करण्यावर भर राहणार आहे.

* कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन ‘मुंबई २४ तास’ संकल्पना राबवण्यात येईल

* गेटवे ते मांडवा स्पीडबोट सेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक, विद्यार्थी वसतिगृहे, माळशेज घाट परिसरात निसर्ग न्याहाळण्यासाठी ‘ग्लास ब्रीज’ आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे