खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा आणि परवडणाऱ्या दरांमध्ये सिटी स्कॅन HRCT चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड १९ च्या निदानासाठी सिटी स्कॅन अर्थात HRCT चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या चाचणीसाठी १० हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.

आणखी वाचा- देशातील ४२ टक्के मृत्यू फक्त ११ जिल्ह्यात; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांचा समावेश

महाराष्ट्रात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. असं असलं तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. दरम्यान राज्य सरकारने करोनाबाबतच्या इतर चाचण्यांचेही दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या निविदेत करोना चाचणीसाठी लागणारा आरटीपीसीआर किट, व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम किट आणि व्हायरल आरएनए एक्स्ट्रॅक्श्न किटसह एकत्रित दर १४८ रुपये आला आहे.

आणखी वाचा- Coronavirus : राज्यात २४ तासांत आठ पोलिसांचा मृत्यू ,३७१ नवे करोनाबाधित

एवढंच नाही तर राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायजर यांचे दर कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. दरम्यान सिटी स्कॅन चाचणी ही कोविडसाठी आवश्यक असते. या चाचणीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये १० हजारांपर्यंत दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता या चाचणीसाठी दर निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.