सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे राज्यावरील कर्जाचा डोंगर मोठय़ा प्रमाणात वाढला असून महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभा आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे केली.

काँग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, राजेंद्र मुळक, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने लोकांची दिशाभूल चालवली आहे. खोटय़ा जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दररोज वाढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. महागाई कमी झालीच नाही, उलट इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारने लावलेल्या कर आणि अधिभारामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. बोंडअळीग्रस्त तसेच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित आहेत. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाषणे आणि घोषणा करण्याशिवाय काहीही केले नाही. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. कुपोषणामुळे बालकांच्या मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे जनतेत तीव्र रोष आहे. शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थी आणि अंगणवाडी सेविका देखील सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधातील हा संघर्ष तीव्र करण्याची गरज आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर होते. भाजपच्या सत्ताकाळात मात्र अधोगती झालेली दिसून येत आहे. सरकारची धोरणे चुकीची आहेत. शेतकरी नाखूष आहे. बेरोजगारी वाढली आहे. सर्वच घटकांमध्ये संताप आहे.

शुक्रवारी येथील टाऊन हॉलमध्ये झालेल्या शिबिरात अशोक चव्हाण यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. भाजपने घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेकडून प्रथम विरोध करण्यात येतो, नंतर त्याचे समर्थन केले जाते. भाजप आणि शिवसेना एकाच माळेचे मणी आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणे आवश्यक आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास सर्वात प्रथम २००९ प्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून संघटित होण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करायची किंवा नाही, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे, असे ते म्हणाले.