News Flash

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर, मारुती चितमपल्ली, यास्मिन शेख, शाम जोशी यांचा गौरव

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख. (संग्रहित छायाचित्र)

राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार आणि अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनाला जाहीर झाला आहे. याशिवाय विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली, मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार शाम जोशी आणि डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली.

व्यावहारिक नफा-तोटा न पाहता, प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, राष्ट्रपुरुष आणि समाजसेवा व समाजसेवक असे अनेक विषय व अनुषंगिक विचार विविध चरित्र पुस्तिकांच्या आणि ग्रंथांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या भारतीय विचार साधना प्रकाशनास यंदाचा श्री.पु. भागवत पुरस्कार दिला जाणार आहे. पर्यावरण आणि वन्यजीवन हे क्षेत्र मराठी भाषेच्या परीघात समृद्ध करणाऱ्या आणि कोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी भाषेला असंख्य नवे शब्द देणाऱ्या मारुती चितमपल्ली यांना यंदाचा विंदा करंदीकर पुरस्कार देण्यात येणार आहे.
अत्त्युच्च त्याग करून सुमारे अडीच लाखांच्या ग्रंथसंपदेचा संग्रह करून, हजारो लोकांपर्यंत मराठी साहित्याचे विविध प्रकार पोहोचविणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयाचे संस्थापक शाम जोशी यांना यंदाचा मंगेश पाडगांवकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी व्याकरणाच्या अध्वर्यू आणि कोश, व्याकरणाचे नियम, म्हणी व वाकप्रचार आणि शालेय शिक्षणातील मराठी या सर्वच बाबतीत उत्तम पुस्तकांद्वारे मार्गदर्शन करणाऱ्या सुप्रसिद्ध व्याकरणतज्ज्ञ व भाषाशास्त्रज्ञ यास्मिन शेख यांना या वर्षीचा अशोक केळकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विंदा पुरस्कार निवड समितीमधील सदस्य श्रीपाद भालचंद्र जोशी, बाबा भांड आणि पाडगांवकर व केळकर पुरस्कार समितीतील सदस्य डॉ. सदानंद मोरे, शामा घोणसे व बाबा भांड यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा करून, मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने ह्या पुरस्कारांबाबत निर्णय घेण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून हे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. येत्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच, २७ फेब्रुवारी, २०१७ रोजी हे चारही पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 6:22 pm

Web Title: maharashtra governments marathi language department announce awards for marathi literatures
Next Stories
1 मातीमोल भाव मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर
2 मधुकर पिचड हे आदिवासीच; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3 शिवसेनेचे मंत्रिमंडळ बैठकीतून वॉक आऊट; पालकमंत्रीपद काढून घेतल्याने नाराजी
Just Now!
X