करोनामुळे राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती कठीण बनली आहे. राज्यात १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या जिल्ह्यातील करोनाचा प्रसाराच वेग मंदावला असला, तरी अपेक्षित तितकं यश अजून मिळताना दिसत नाही. या जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागासह राज्य सरकारच्या सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर लढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात अनेक खासगी डॉक्टरांनी आपले रुग्णालये बंद ठेवली आहेत. अशा डॉक्टरांना ठाकरे सरकारनं सेवेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे.

करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यानं खासगी डॉक्टरांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याचबरोबर लॉकडाउन असल्यानंही डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवली आहेत. वैद्यकीय सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांनी आपली रुग्णालये बंद ठेवू नये, असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. या आवाहनानंतर राज्य सरकारनं करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांना समोर येण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती

याविषयी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक यांनी माहिती दिली. “ज्याचं वय ५५ वर्षांच्या आत आहे. ज्यांना कोणतीही व्याधी नाही आणि ज्यांनी आपली रुग्णालये लॉकडाउनमुळे बंद ठेवली आहेत. अशा सर्व खासगी डॉक्टरांना १५ दिवस करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना या सेवेबद्दल शासनाकडून मानधन दिले जाईल. त्याचबरोबर उपचारासाठीची सर्व सुरक्षा साहित्यही सरकारकडून पुरवण्यात येईल,” अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालकांनी दिली.

राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून, खासगी डॉक्टरांनी पीपीई किट्स अभावी तसेच करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीनं रुग्णालये बंद ठेवली आहेत. याचा फटका करोनाशिवाय इतर आजार असलेल्या रुग्णांना बसत असल्याचं दिसून येत आहे.