राज्यामध्ये सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने आधीच्या भाजपा सरकारच्या काळातील अनेक निर्णयांवर फेरविचार सुरु केला आहे. मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. या निर्णयानंतर आता राज्य सरकारने भाजपा सरकारचा अजून एक निर्णय रद्द केला आहे. गुजरातमधील एका कंपनीला दिलेलं कोट्यावधींचे कंत्राट राज्य सरकारने रद्द केलं आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) गुजरातमधील लल्लूजी अँड सन्स या कंपनीला घोड्यांसंदर्भातील एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजनाचे कंत्राट दिले होते. मात्र यामध्ये मोठी आर्थिक अनियमितता असल्याचे सांगत सरकारने हे कंत्राट रद्द केलं आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार २६ डिसेंबर २०१७ रोजी एमटीडीसीने अहमदाबादमधील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीबरोबर करार केला होता. ३२१ कोटी रुपयांच्या या करारानुसार नंदूरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक उत्सावाच्या आयोजनाचे सर्व काम या कंपनीला देण्यात आले होते. यामध्ये अगदी उत्सावाची रुपरेखा आखणे, डिझाईन करणे, त्याचे सर्व व्यवस्थापन पाहणे या सर्व कामांचा समावेश होता. २८ नोव्हेंबरला महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रमुख सचिव अजॉय मेहता यांनी हा करार रद्द करण्याचे आदेश दिले.

फडणवीस सरकारने गुजरातमधील या कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केलं आहे. या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता असल्याचे आढळून आल्याची माहिती पर्यटन विभागाचे अवर सचिव एस. लंभाटे यांनी दिली आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात घोड्यांच्या उत्सावाचे आयोजन केले जाते. देशातील प्राण्यांच्या उत्सवापैकी एक असणारा हा उत्सव मागील तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केला हातो.

महाविकास आघाडी सरकारने मागील काही दिवसांमध्ये मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरे आंदोलक, नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. आधीच्या सरकराच्या सर्व व्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.