निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एस.डी.आर.एफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असा दिलासाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, “वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सुचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल,” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
बदललेल्या निकषामुळे मदतीत दीड ते ३ पट वाढ
-पक्क्या- कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती, ती आता १ लाख ५० हजार इतकी वाढवण्यात आली आहे.
-बहुवार्षिक पिकाच्या नुकसानभरपाई साठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती, ती वाढवून ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल
-अंशत: पडझड झालेल्या घरासाठी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती, ती आता १५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
-कच्च्या घराच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती, ती आता १५ हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
-नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून १५ हजार इतकी करण्यात आली आहे.
-गावात लहान मोठी दुकाने, टपरी चे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे.
-ज्यांची घरे पूर्णत: क्षतिग्रस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते. आता विशेष बाब म्हणून ही मदत वाढविण्यात आली आहे. ती कपडे व भांडी यासाठी प्रती कुटुंब प्रत्येकी ५ हजार अशी करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 8:39 pm