29 September 2020

News Flash

‘जलयुक्त’चेही आता मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

राज्य सरकारने आता जलयुक्त शिवार अभियानाचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन विकसित करून त्याअंतर्गत येणाऱ्या कामांचे जीपीएस आधारित अपडेटिंग करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

| August 27, 2015 04:03 am

राज्य सरकारने आता जलयुक्त शिवार अभियानाचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन विकसित करून त्याअंतर्गत येणाऱ्या कामांचे जीपीएस आधारित अपडेटिंग करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. एखादी सरकारी योजना अशा रीतीने ऑनलाइन होण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे या अभियानाने विश्वासार्हतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विशेष म्हणजे ही अपडेटिंग भविष्यातील सर्वच सरकारी योजनांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
महाराष्ट्राला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी भूपृष्ठावरील पाण्याचा साठा आणि जलपातळी वाढण्याच्या उद्देशाने सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची आखणी केली आहे. त्यात विविध जलसंधारण, पाणलोट विकास यासह विविध फळबाग लागवडीची कामेही समाविष्ट केली आहेत. बहुतेक सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत प्रत्यक्ष कामांपेक्षा कागदपत्रांच्या पूर्ततेलाच महत्त्व दिले जाते. साहजिकच लाभक्षेत्रावरील कामाचा प्रत्यक्ष पुरावादेखील कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्याची संधी चुकार कर्मचाऱ्यांना मिळते. जलयुक्त शिवार अभियानात मात्र असे सदोष मूल्यमापन दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या धोरणांतर्गत सरकारच्या महाराष्ट्र रिमोट सेिन्सग अ‍ॅप्लिकेशन सेंटरने जलयुक्त शिवार अभियानाचे मोबाइल सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन इंटरनेटवरून डाऊनलोड करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून यामध्ये लाभक्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष कामांची छायाचित्रे अपलोड करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही छायाचित्रे काढण्यासाठी जलयुक्त शिवारच्या अ‍ॅप्लिकेशनमधील जीपीएस प्रणाली सुरू करावी लागते. साहजिकच प्रत्येक छायाचित्रावर अक्षांश-रेखांशाची नोंद होऊन ते जलयुक्तच्या इंटरनेट साईटवर अपलोड होत आहेत. यामुळे कामांचा प्रत्यक्ष पुरावा सर्वाना उपलब्ध होत असून अधिकाऱ्यांनाही या कामांवर ऑनलाइन निरीक्षण ठेवणे शक्य झाले आहे. ‘जलयुक्त’च्या या जीपीएस आधारित ऑनलाइन कार्यप्रणालीने या अभियानाची विश्वासार्हता वाढण्यास मदत झाली आहे. कृषी विभाग, जलसंधारण, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद या विभागांचा या अभियानात समावेश आहे.
‘जलयुक्त’च्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये प्रोफाईल मॅनेजर, मॅप अक्टिव्हिटी, सेंड मॅनेजर, वूव्ह अँड डिलीट हेल्प अँड क्रेडिट आणि एक्झिट अशी सहा फंक्शन आहेत. त्यात मॅप अ‍ॅक्टीव्हिटीमध्ये गाव, कामाचे नाव, मंजूर किंमत, सद्यस्थिती आणि जीपीएस आधारित फोटो काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. सुदैवाने सुरुवातीची सहा फंक्शन इंग्लिश भाषेत नोंदवली असली तरी आतील माहिती मराठी भाषेतच देण्यात आली आहे. mrsac.maharashtra.gov.in/jalyukt/  या पत्त्यावर हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध असून याच साईटवर कोणत्याही जिल्ह्य़ातील कामाची प्रत्यक्ष माहिती घेणे कोणालाही शक्य होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासूनच या अ‍ॅप्लिकेशनचे काम सुरू झालेले असल्याने अजूनही अनेक ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना छायाचित्रे योग्य रीतीने अपलोड करणे जमलेले नाही. साहजिकच साईटवरील माहिती अजूनही परिपूर्ण नसल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 4:03 am

Web Title: maharashtra govt make jalyukta shivar abhiyan mobile app
Next Stories
1 राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम गुंडाळण्याचा राज्य सरकारचा डाव
2 गडाख, लंघे यांच्यासह सहा जणांना अटक
3 शासनाच्या निषेधार्थ कोल्हापुरात काँग्रेसचा मोर्चा
Just Now!
X