कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांना राज्य शासनाने दणका दिला असून, त्यांचे महापौरपद रद्द करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या सहीचा आदेश सायंकाळी आयुक्तांना प्राप्त झाला. लाचखोरीच्या कारवाईमध्ये महापौर व नगरसेवकपद गमवाव्या लागलेल्या माळवी या राज्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.जागेच्या आरक्षणामध्ये फेरफार करण्यासाठी १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचखोर महापौरांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहरात शिवसेनेसह विविध पक्षांनी आंदोलन केले होते. तर महापालिकेत झालेल्या सभेमध्ये माळवी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या बाजूने माळवी यांनीही मतदान केले होते.