News Flash

करोना चाचणी : राज्य सरकारचा खासगी लॅबला दणका, तर सामान्यांना दिलासा

दरात ५० टक्क्यांची कपात

राज्य सरकारनं करोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना करोनाचं निदान करणाऱ्या चाचणीचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे होते. आयसीएमआरनं निश्चित केलेले ४५०० हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला असून, करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात खासगी लॅबला दणका दिला आहे. दुसरीकडे सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळला आहे.

आयसीएमआरनं सर्व राज्यांना करोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता. या समितीनं करोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता.

त्यानंतर सरकारनं दर निश्चित केले. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, “खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जाईल. कमी कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,” असं टोपे म्हणाले.

“व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,” असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.

राज्यात आतापर्यंत सहा लाखाहून अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकूण ५५५ प्रयोगशाळा असून राज्यात ८८ प्रयोगशाळांच्या माध्यमातून वेगाने चाचण्या केल्या जात आहेत. सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांच्या चाचणीचे अहवाल मिळण्यास तीन ते सहा दिवस लागायचे मात्र आता हे अहवाल चोवीस तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात आज घडीला दर दहा लाख लोकांमागे २३६३ करोना चाचण्या केल्या जातात तर राज्यात हेच प्रमाण दहा लाख मागे १३,००० एवढे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 1:36 pm

Web Title: maharashtra govt slashes charges for covid tests by private labs bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘फेकुताई’ म्हटल्याने नगरसेविकाला राग अनावर, तरुणासह कुटुंबावर सशस्त्र हल्ला
2 ‘नासाचे शास्त्रज्ञ’ प्रणित पाटील येत आहेत ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर
3 गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने केले ऑनलाईन शैक्षणिक ऑडिट
Just Now!
X