पीजी मेडिकल प्रवेशाबाबत कॅबिनेट निर्णयानंतर एसईबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सही केली आहे. त्यामुळे आता पीजी प्रवेशाला आणि एमबीबीएस प्रवेशाला मराठा आरक्षण लागू होणार. असं असलं तरीही खुल्या प्रवर्गाने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने आणलेल्या या अध्यादेशामुळे २०१९-२० या वर्षासाठी शिक्षण संस्थांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. मराठा आरक्षणामुळे देण्यात आलेले प्रवेश सुप्रीम कोर्टाच्या निकाला मुळे रद्द झाले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण लागू होणार नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे नव्याने प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होती. यामुळे मराठा विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीही होती. अशा परिस्थितीत अध्यादेश आणण्याचा मार्गच राज्य सरकारपुढे होता. मात्र लोकसभा निवडणकीची आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकार थेटपणे अध्यादेश आणू शकत नव्हते. त्यासाठीच निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली. अध्यादेश आणण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिल्यावर मागील शुक्रवारी या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. आता या अध्यादेशावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांची स्वाक्षरी झाली आहे.